चित्रा न्युज प्रतिनिधी
शिरपूर :- शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरातील ८ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अनिल किरोभा काळे या नराधामावर पोक्सो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करा व प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे आदिवासी समाजातर्फे १८ ऑगस्ट २०२५ रोजी मूक मोर्चा काढण्यात आला.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे,तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा,सचिव शरद पावरा,उपाध्यक्ष रवींद्र पावरा,कार्याध्यक्ष विजय पावरा,सहसचिव दिनेश पावरा, प्रसिद्धीप्रमुख पवन सोलंकी ,जितेंद्र भंडारी,चांदसूर्या शिरपूर,मध्यप्रदेश बंधारा बुजूर्ग, शहाणा शहादा येथील शाखेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात एका ८ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर अनिल किरोभा काळे वय २८ या नराधामाने अमानुष पणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.१५ ऑगस्ट ला देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्सव जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील एका ८ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची हृदयद्रावक घटना घडली आहे.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.आरोपी हा शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्यासमोर हाॅटेल चालवतो.त्या हाॅटेल मध्ये दारू,गांजा सारखे अवैद्य व्यवसाय सुरू होते,असेही समोर आले आहे.
आरोपी अनिल काळे याने ८ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.अशा प्रकारच्या अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी असे कृत्य करणा-यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या