विजय चौडेकर, जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज नांदेड
नांदेड :- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हसनाळ, रावणगाव,भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन ग्रामस्थ अडकून पडले होते.
सुरुवातीला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने पहाटे बचाव कार्यास सुरूवात केली. तथापि पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने तसेच कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सैन्य दलास पाचारण केले होते. दिनांक 18 रोजी सायंकाळी पुणे येथील 269 इंजिनिअर रेजिमेंट व छत्रपती संभाजीनगर येथील 321 मेडियम रेजिमेंट यांनी मदत व बचाव कार्यात सहकार्य केले.या तुकड्यांनी 43 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच 650 नागरिकांना भोजन तसेच 200 लोकांना आरोग्य शिबिरातून सेवा दिली.त्यामुळे आणखी मोठी हानी टाळणे शक्य झाले. आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मोठी मदत झाली. बुधवार दिनांक 20 रोजी सदर दोन्ही तुकड्यांना कार्यमुक्त केले.याप्रसंगी लेफ्टनंट कर्नल सागर महात्मे, मेजर सुमित चामले, कॅप्टन राणा, कॅप्टन निखिल कदम यांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या