वर्धा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार : आसिफ खान
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :- दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमिन (AIMIM) पक्षाची राज्यस्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य महासचिव समीर साजिद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या वेळी वर्धा जिल्ह्याचे एआयएमआयएम चे नेते तथा माजी नगरसेवक सलीम उर्फ सल्लू भाई शेख आणि वर्धा शहराध्यक्ष आसिफ खान यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा झाली. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्षाच्या विचारधारेनुसार सामान्य जनतेच्या हितासाठी AIMIM पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की AIMIM हा सर्वसामान्यांचा आवाज असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता AIMIM स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे.
स्थानिक पातळीवर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
बैठकीत विविध जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांनी आपले मतप्रदर्शन केले व आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या