चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची स्थिती अत्यंत वाईट बनली असून, गेल्या 11 महिन्यात 1987 शेतकर्यांनी आपल्या जिवनाचा दोर कापला आहे. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, लहरी पाऊस आणि सरकारी योजनांच्या अपयश, कमी झालेले बाजारभाव आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला असून टोकाचा निर्णय घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
11 महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात 973 शेतकरी आत्महत्या झाल्या, तर मराठवाड्यात 1014 शेतकऱ्यांनी जिवनयात्रा संपवली. विदर्भात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सन 2001 पासून शासन स्तरावर शेतकरी आत्महत्यांची नोंद घेण्यास सुरुवात झाली, परंतु गेल्या दोन दशकात परिस्थितीत ठोस बदल झाल्याचे काही चित्र दिसत नाही. गेल्या 11 महिन्यांत पश्चिम विदर्भात 973 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. या भागात अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम असे जिल्हे कायमच कृषी संकटात राहिले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे नाव तर नेहमीच शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात पुढे येत असल्याचे आढळते.
तर मराठवाड्यात 1014 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली हे जिल्हे पाणीटंचाई, दुष्काळ, हवामानातील मोठे बदल आणि अत्यल्प पाऊस यामुळे कायमच समस्यांनी ग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट करतो.
सध्या विदर्भात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने या मुद्यावर सरकारची भूमिका काय असेल, या कुटुंबांना न्याय मिळेल का आणि या आत्महत्यांचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी 2001 पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर 2025 या कालावधीत 22,038 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी 11,295 प्रकरणे पात्र ठरली तर 11,366 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. हे सर्व शेतकरी केवळ अस्मानी-सुल्तानी संकटाचे नव्हे, तर शासन, प्रशासनाच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
पश्चिम विदर्भात 11 महिन्यांत म्हणजेच 335 दिवसांत 973 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजेच अमरावती विभागात दर एका दिवसाला दोन शेतकरी मृत्यूला कवटाळत असून सर्वाधिक आत्महत्या कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या यवतमाळ जिल्हयात होत आहेत. सन 2001 पासून विचार केला तर यवतमाळ जिल्हयात 6489 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अमरावती जिल्हयात 5546 शेतकर्यांनी जिवनयात्रा संपवली. बुलढाणा जिल्हयात 4592 शेतकर्यांनी जीवनाचा दोर कापला. अकोला जिल्हयात 3262 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आणि वाशिम जिल्हयात 2149 शेतकर्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. शेतमालाला योग्य दर न मिळणे, खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, जंगली प्राण्यांचा त्रास, पावसाचे झालेले नुकसान ही शेतकरी आत्महत्यांची मुख्य कारणे ठरत आहेत.


0 टिप्पण्या