Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीत कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा! माजी नगरसेवकाला भरचौकात मारहाण ; पोलिसांच्या नोटिशीला केराची टोपली?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बार्शी  : बार्शी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरात आनंदाऐवजी दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील वर्दळीच्या पांडे चौक परिसरात एका माजी नगरसेवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे बार्शी पोलीस प्रशासनाचा वचक संपला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

निवडणूक निकालानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बार्शी पोलीस ठाण्याच्या वतीने प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या नोटिसांचा समाजकंटकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पांडे चौकातील घटनेवरून स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा केवळ 'कागदी घोडे' नाचवण्यासाठीच होत्या का? असा प्रश्न या हल्ल्यामुळे निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर (Ground Level) शांतता राखण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे चित्र दिसत आहे. एका लोकप्रतिनिधीवर (माजी नगरसेवक) भरचौकात हल्ला होतो, ही बाब पोलीस प्रशासनासाठी अत्यंत भूषणावह नसून, गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

"कायदा आणि सुव्यवस्था राखणे" हे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य असताना, बार्शीत मात्र परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलीस विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. केवळ कागदोपत्री कारवाई दाखवून पोलीस आपले हात झटकू शकत नाहीत.

आता प्रश्न उरतो तो इतकाच की, या भ्याड हल्ल्यातील दोषींवर पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करणार की राजकीय दबावापोटी पुन्हा एकदा 'तपासाचे' नाटक रंगणार?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या