चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-नागपूर येथे नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात तसेच त्याआधी मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर (राज्यमंत्री) यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, ही अत्यंत दुर्दैवी व संतापजनक बाब आहे की वर्धा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेबाबत एकाही लोकप्रतिनिधीने सभागृहात ठोस व प्रभावी आवाज उठवला नाही.
विशेष म्हणजे, मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात सेवाग्राम येथील एका खासगी रुग्णालयासाठी प्रश्न उपस्थित करण्यात आले, परंतु गरीब, शेतकरी, मजूर व ग्रामीण जनतेची जीवनरेषा असलेले वर्धा जिल्हा सरकारी रुग्णालय मात्र पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आले.
आज वर्धा जिल्हा सरकारी रुग्णालयातील वास्तव अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे—
एमआरआय मशीन अनेक महिने बंद असते
सीटी स्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त राहते
रुग्णांसाठी लिफ्टसारखी मूलभूत सुविधा बंद आहे
गंभीर व आपत्कालीन रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जाते
अशा परिस्थितीत जनतेला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की—
हे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे की केवळ नावापुरते क्लिनिक?
याहूनही गंभीर बाब म्हणजे, वर्धा शहरात प्रस्तावित असलेले सरकारी मेडिकल कॉलेज व रुग्णालय जनतेची कोणतीही संमती न घेता जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर ‘जाम’ येथे स्थलांतरित करण्यात आले.
या निर्णयामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची सुलभ, तातडीची व परवडणारी आरोग्यसेवा प्रत्यक्षात हिरावून घेतली गेली आहे.
एकीकडे सरकारी मेडिकल कॉलेज शहराबाहेर हलवले जाते,
दुसरीकडे जिल्हा सरकारी रुग्णालय जाणीवपूर्वक साधनसामग्रीविना ठेवले जाते,
आणि विधानसभेत मात्र खासगी रुग्णालयांसाठी आवाज उठवला जातो—
हे सर्व पाहता सरकारी आरोग्य व्यवस्था कमकुवत करण्याचा ठराविक व धोकादायक पॅटर्न स्पष्टपणे दिसून येतो.
आरोग्य ही कोणतीही दया किंवा उपकार नाही—
तो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
हा हक्क वर्धा जिल्ह्यातील जनतेला सातत्याने नाकारला जात आहे.
आता वर्धा जिल्ह्याची जनता थेट आणि ठाम प्रश्न विचारत आहे—
जिल्हा सरकारी रुग्णालय केव्हा सक्षम होणार?
सरकारी मेडिकल कॉलेज वर्धा शहरात केव्हा येणार?
आणि जनतेच्या आरोग्यावर होत असलेल्या या अन्यायाला जबाबदार कोण?
जनतेच्या आरोग्याशी चाललेला खेळ तात्काळ थांबवावा,
वर्धा जिल्ह्याला त्याची हक्काची, दर्जेदार सरकारी आरोग्यसेवा त्वरित उपलब्ध करून द्यावी.
असे ठाम आरोप वीर अशोक सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्की सवाई यांनी केले आहेत.


0 टिप्पण्या