चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे:- जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, अशी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या विविध विषयांनी आढावा बैठक आज दुपारी झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके यांच्यासह आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना उद्दिष्टे निश्चित करून देण्यात यावीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमितपणे स्वच्छता व साफसफाई राखली जावी. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना अचानक भेटी देऊन सेवा गुणवत्तेची तपासणी करावी. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. माता मृत्यूच्या प्रत्येक घटनेची सविस्तर माहिती संबंधित सर्व यंत्रणांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. कुटुंब नियोजनासाठी विविध ठिकाणी आरोग्य व जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे.
तसेच पीसीपीएनडीटी कायद्यानुसार सोनोग्राफी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता व संवेदनशीलता राखून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करावा, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शेख म्हणाले की, जिल्ह्यात नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात यावेत. नवीन उप जिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करताना जागेची तसेच सर्व मानके तपासून खात्री करावी. समवर्ती / वैधानिक लेखा परीक्षणाची पूर्तता करावी. या कामाचा दर 15 दिवसांनी नियमित आढावा घ्यावा. सॅम व मॅम बालकाचे जास्तीत जास्त स्क्रिंनिंग करावे. टी.बी मुक्त भारत अभियानातंर्गत जास्तीत जास्त टीबीच्या टेस्ट कराव्यात. प्रधानमंत्री टी.बी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच टीबी रुग्णांना पोषण आहार पुरविण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून अधिकारी, सामाजिक संस्थांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीत रुग्ण कल्याण समिती, नियमित लसीकरण मोहिम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक समिती, जिल्हा स्थायी लेखा समिती, टी.बी.मुक्त भारत, जिल्हा जन्म मृत्यू समन्वय समितीचा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.


0 टिप्पण्या