चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी: राजकारणात पैसा आणि सत्तेचे वलय असतानाच, परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवा आदर्श पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक ३ 'ड' मधून वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ते संदीप भीमराव खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक ते कोणत्याही मोठ्या भांडवलदाराच्या जीवावर नव्हे, तर चक्क 'लोकवर्गणी' आणि जनतेच्या विश्वासावर लढवत आहेत.
संदीप खाडे हे अनेक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत. यंदा पक्षाने त्यांना सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली आहे. मात्र, त्यांच्यासमोर आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि उमेदवारांचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत संदीप खाडे डगमगले नाहीत.
"माझ्यासमोर श्रीमंत आणि धनदांडगे उमेदवार असले, तरी माझ्या पाठीशी सामान्यांची एकी आणि संविधानाची ताकद आहे," असे त्यांनी भावूकपणे व्यक्त केले.
संदीप खाडे यांनी ही निवडणूक पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि पारदर्शक पद्धतीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे प्रचारासाठी मोठी यंत्रणा नसली, तरी प्रत्येक घराचा उंबरठा ओलांडून ते लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.
संदीप खाडे यांचे आवाहन:
"मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. आजवर लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरलो, आता ही निवडणूकही लोकांच्या प्रश्नांसाठीच लढत आहे. माझ्याकडे धनशक्ती नाही, पण लोकशक्ती नक्कीच आहे. ही निवडणूक मी लोकांच्या लोकवर्गणीतून लढवत असून, सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी आणि समाजबांधवांनी मला सढळ हाताने मदत करावी. तुमची साथ हाच माझा विजय आहे."
प्रभाग क्रमांक ३ 'ड' मधील नागरिकांमध्ये संदीप खाडे यांच्याबद्दल एक आत्मीयता पाहायला मिळत आहे. "आपल्यातील एक माणूस, जो कायम आपल्या मदतीला धावून येतो, तो आज उमेदवारी अर्ज भरत आहे," अशी भावना प्रभागातील जनता व्यक्त करत आहे. खाडे यांच्या या संघर्षाला समाजाच्या सर्व थरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


0 टिप्पण्या