चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई: "पुरोगामी महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीवर 'आर्थिक दरोडा' टाकला जात असून, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या मार्केटिंगसाठी अनुसूचित जाती उपयोजनेचा ५०८.७५ कोटींचा निधी वळवणे हा निंदनीय प्रकार आहे," असा घणाघाती आरोप करत 'पँथर आर्मी' च्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर आक्रमक 'भीम गर्जना' लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख मा. संतोषजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निधी पळवापळवीचा हिशोब द्या!
आंदोलनाला संबोधित करताना संतोष आठवले म्हणाले की, "सरकार एका बाजूला महापुरुषांच्या नावाचा जप करते आणि दुसऱ्या बाजूला त्याच महापुरुषांच्या अनुयायांच्या विकासाचा निधी पळवते. सामाजिक न्याय विभागाचा ५०८.७५ कोटींचा निधी ६ मार्चच्या आत परत न केल्यास हे आंदोलन राज्यभर तीव्र केले जाईल."
पँथर आर्मीच्या प्रमुख मागण्या:
आंदोलकांनी मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
निधी संरक्षण कायदा: आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'अनुसूचित जाती व जमाती उप-योजना (निधीचे वाटप व विनियोग) कायदा' तात्काळ मंजूर करावा.
विशेष सन्मान निधी: जर SC/ST निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात असेल, तर या समाजातील महिलांना १५०० ऐवजी १५,००० रुपये प्रतिमहा विशेष सन्मान निधी द्यावा.
घरकुल अनुदान: रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाढवून सरसकट १० लाख रुपये करावे.
कर्जमाफी व जमीन: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेकरिता भूमिहीनांना बाजारभावाप्रमाणे शेतजमीन खरेदी करून द्यावी. तसेच जुन्या लाभार्थ्यांचे थकीत कर्ज आणि परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज त्वरित माफ करावे.
जातनिहाय जनगणना: सन २०२६-२७ च्या जनगणनेत सर्व घटकांची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करून सामाजिक न्याय प्रस्थापित करावा.
'जेल भरो'चा इशारा
या आंदोलनात उमेश जामसंडेकर, प्रा. अरुण मेढे, अमोल कुरणे, ज्योतीताई झरेकर, लक्ष्मीकांत कुंबळे, अँड. किरणराव मोरे, मच्छिंद्र रुईकर, नितेश कुमार दिक्षांत आणि सिताबाई शिरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
"हे केवळ लाक्षणिक उपोषण असून एक इशारा आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर 'जेल भरो' आणि 'चक्काजाम' आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा पँथर आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे.
मंत्र्यांचे आश्वासन:
पँथर आर्मीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मंत्री शिरसाट यांनी या मागण्यांची पूर्तता करण्याचे अभिवचन शिष्टमंडळाला दिले आहे.


0 टिप्पण्या