Ticker

6/recent/ticker-posts

दलितांच्या हक्कांच्या निधीसाठी 'पँथर आर्मी'चा मुंबईत एल्गार; आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा

​नवे दानवाडमध्ये संघटनेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात; संस्थापक संतोष आठवले यांची सरकारवर सडकून टीका


चित्रा न्युज प्रतिनिधी 
​नवे दानवाड :-अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा आणि या निधीला कायदेशीर संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी 'पँथर आर्मी' संघटना आता राज्यव्यापी लढा पुकारणार आहे. "सरकारने दलितांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवणे थांबवावे, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले यांनी दिला.
​नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आणि पँथर आर्मीचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ७ महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
​प्रमुख मागण्या आणि मंजूर ठराव:
​मेळाव्यात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रत केंद्र व राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे:
​विशेष आर्थिक अधिकार कायदा: SC/ST समाजाचा निधी इतर कामांकडे वळवण्यास बंदी घालणारा कायदा मंजूर करावा. तसेच, अखर्चित निधी रद्द न करता तो पुढील वर्षासाठी 'कॅरी फॉरवर्ड' करावा.
​महिला सन्मान निधी: 'लाडकी बहीण' योजनेचा निधी जर SC/ST बजेटमधून वापरला जात असेल, तर या समाजातील महिलांना १५०० ऐवजी १५,००० रुपये सन्मान निधी द्यावा.
​सामाजिक सुरक्षा: संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ६,००० रुपये करून उत्पन्न मर्यादा २.५ लाखांपर्यंत वाढवावी. नोंदणीकृत कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ५,००० रुपये पेन्शन लागू करावी.
​शिक्षण व गृहनिर्माण: परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जे माफ करावीत आणि रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाढवून १० लाख रुपये करावे.
​रोजगार: मागासवर्गीय महामंडळांना ५० लाखांपर्यंत विनाव्याज कर्ज द्यावे आणि डिलिव्हरी बॉईजसारख्या 'गिग वर्कर्स'साठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.
​मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
​या कार्यक्रमाला 'दैनिक दवंडी'चे मुख्य संपादक विश्वास कांबळे, सरपंच डॉ. सी. डी. पाटील, बांधकाम कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी, ज्येष्ठ धम्म प्रचारक बी. आर. कांबळे आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते सेनापती भोसले यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्याचा अहवाल मांडला.
​विशेष उपक्रम:
​कार्यक्रमात 'दैनिक दवंडी'च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कृतज्ञता म्हणून गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ भीमगीतकार सुरेश सातारकर (हुपरी ) व आंबेडकरी चळवळी चे युवा नेते राजू कांबळे (नवे दानवाड ) यांच्या उपस्थित जयभीम गायन पार्टी हुपरी यांचा क्रांतिकारी भीमगीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांमध्ये चैतन्य भरले.
​उपस्थित पदाधिकारी:
यावेळी मुत्ताप्पा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, नितेश कुमार दीक्षांत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई सातारकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष राजू मोमीन, प्रा. अमर ढंग, भैय्यासाहेब धनवडे, सौ. अर्चना कांबळे, रेखा भोरे यांच्यासह पँथर आर्मीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या