Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पालेवाडा येथे भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथेचे भव्य उद्घाटन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम पालेवाडा येथील शिव मंदिर परिसरात दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवारी सकाळी नऊ वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात कलश यात्रेने श्री शिवमहापुराण कथेची मंगलमय सुरुवात करण्यात आली. गावभर हर हर महादेवच्या जयघोषात निघालेल्या या कलश यात्रेमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
दुपारी एक वाजता आयोजित उद्घाटन सोहळा गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री जगदीशजी येरोला यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री शसेंद्रकुमार भगत यांच्या हस्ते कथेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन श्री गोपाल ठाकुर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव), श्री छोटूभाऊ बिसेन (अध्यक्ष, नगर पंचायत गोरेगाव) तसेच सौ. भूमेश्वरीताई रहांगडाले (अध्यक्ष, महिला तालुका काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठ पूजन श्री शंकर चौहान सर (मुख्याध्यापक, गोरेगाव) व सौ. मालनबाई गौतम (संचालक, खरेदी-विक्री संस्था गोरेगाव) यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवमहापुराण कथेचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजात सदाचार, भक्ती व संस्कार दृढ करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची गरज व्यक्त केली.
सदर श्री शिवमहापुराण कथा हा धार्मिक सोहळा दिनांक १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून १६ फेब्रुवारी रोजी दहीकाला व महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. कथेचे प्रभावी, ओजस्वी व रसाळ प्रवचन कुमारी साध्वी गुनितादिदी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धा-भावनेने कथेचा लाभ घेत आहेत.
भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या सोहळ्यामुळे ग्राम पालेवाडा परिसरात धार्मिक चेतना जागृत झाली असून पुढील काही दिवस प्रवचन, भजन-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच पवित्र होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम पालेवाडा येथील समस्त ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या