जादूटोणा, अंधश्रद्धा यासाठी वापर होत असल्याचा आरोप
चित्रा न्युज प्रतिनिधी
औरंगाबाद :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वस्तुसंग्रहालयातील विविध प्राणी, पक्षी यांच्या अवशेषांची चोरी करून त्याचा वापर जादूटोणा, अंधश्रद्धा यासाठी वापर होत असल्याचा आरोप सचिन निकम, राहुल वडमारे यांनी केला असून विविध मागण्याचे निवेदन त्यांनी कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांना दिले आहे.
संग्रहालयात प्रामुख्याने घुबड या वन्यजीव कायद्या अंतर्गत संरक्षित पक्षाच्या अवशेषांमधील नखे, पिसे व अवयव काढून घेण्यात आल्याची गंभीर बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून
या निवेदनात प्राणिशास्त्र विभागात विविध प्राणी, पक्षी यांचे अवशेष, हाडे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जतन करून ठेवण्यात आली असून यातील काही प्राणी पक्षी यांचे विविध अवयव हे मौल्यवान असल्याने त्याची काळ्या बाजारात मोठी किंमत असल्याने जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेच्या कामात याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून वस्तुसंग्रहालयाची सुरक्षा तोकडी असल्याचा आरोप केला आहे. प्राणिशास्त्र विभागाच्या
तसेच वस्तुसंग्रहालयातील बहुतांश कपाटांना टाळे नाही, पुरेशी स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
प्रामुख्याने घुबड या पक्षाची नखे, पिसे हे अवयव गायब असून ही घटना केवळ चोरी किंवा निष्काळजीपणाचा प्रकार नसून, वन्यजीव तस्करी, काळा बाजार, अंधश्रद्धा-आधारित जादू टोणा यांसारख्या घृणास्पद आणि गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली आहे.
विद्यापीठासारख्या शैक्षणिक आणि पुरोगामी संस्थेत, असा प्रकार घडणे हे अत्यंत अशोभनीय, लाजिरवाणे असल्याने याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करून
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत
१) या घटनेची तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
२) वस्तुसंग्रहालयातील सर्व जतन नमुन्यांची पूर्ण पडताळणी (Inventory Audit) करून अहवाल जाहीर करावा.
३) सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंदी, सुरक्षा कर्मचारी, विभागातील जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
४) ही घटना वन्यजीव तस्करी / चोरी या स्वरूपाची असल्याने, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करावा.
५) भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी वस्तुसंग्रहालयात सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, डिजिटल रेकॉर्ड, लॉक-सील व्यवस्था अधिक मजबूत करावी.
विद्यापीठाने अधिकृतपणे अंधश्रद्धा विरोधी भूमिका स्पष्ट करून, या घटनेबाबत पारदर्शक माहिती प्रसिद्धीस द्यावी व सर्व संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सचिन निकम, राहुल वडमारे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या