Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना साहित्यव्रती पुरस्कार जाहीर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-झाडीबोली चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना साहित्यव्रती पुरस्कार घोषीत झालेला आहे. अमरावती येथील मातोश्री स्व. सूर्यकांता देवी रामचंद्र पोटे चॅरिटेबल ट्रस्ट वतीने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संस्थेने या पुरस्कारांची घोषणा केली असून  राज्यस्तरीय उत्कृष्ठ वांड:मय निर्मिती पुरस्कारासाठी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड केलेली आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी कथा, कविता, नाटक, संगीतिका इत्यादी ललित साहित्या सोबत भाषाशास्त्र, लोकसाहित्य, शब्दकोश अशा साहित्यासह एकूण १११ ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वांड:मय पुरस्कार ४ वेळा प्राप्त झाला असून शासनाने भाषा संवर्धक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांना विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्याकडून उत्कृष्ठ वांड:मय पुरस्कार दोनदा प्राप्त झालेला आहे. ३ वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीने त्यांना खडीगंमत या लोकसाहित्य प्रकाराच्या विशेष कार्याबद्दल अमृत पुरस्कार प्रदान केला आहे. लोकसाहित्य क्षेत्रातील संगीत अकादमीचा पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे विदर्भातील एकमेव लोक साहित्यकार आहेत. त्यांना आतापर्यंत ५२ पुरस्कार प्राप्त झाले असून हा ५३ वा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे, राज्यस्तरीय मराठी वांड:मय पुरस्कार आयोजन समितीच्या संयोजिका डॉ. शोभा रोकडे, मुख्य आयोजक प्रवीणभाऊ पोटे आणि निवड समितीचे अन्य सदस्य यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या दिवंगत पत्नी ताराबाई हरिश्चंद्र बोरकर यांची बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ ला असलेल्या चौदाव्या पुण्यतिथीच्या पर्वावर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे. सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ ला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. बोरकर यांना देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोली महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय साहित्यव्रती पुरस्कारामुळे झाडीबोली साहित्य चळवळीला आणखी बळ प्राप्त होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या