Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ. हरिश्चंद्र बोरकर हे पदमश्री पुरस्काराचे खरे मानकरी - प्रविण पोटे पाटील

डाॅ. बोरकर यांना अमरावतीत राज्यस्तरीय साहित्यव्रती पुरस्कार प्रदान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-पुरस्कार हे कलावंतांच्या कलेला, साहित्यिकांच्या साहित्याला नवी संजीवनी देतात. यातून प्रतिभावंतांना पुढे उत्तम कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा, नवी उर्जा व नवा उत्साह मिळतो. स्व.सूर्यकांतादेवी पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेल्या तेरा वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावंतांच्या कलाकृतींचे, कला व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनिय योगदानाचे महत्व लक्षात घेवून पुरस्कार दिले जातात. झाडीबोली चळवळ उभी करून केवळ स्वत:पुरते मर्यादित न राहता अख्खे आयुष्य अनेक नवोदित प्रतिभावंतांना पुढे आणण्यासाठी झिजलेल्या बोलीमहर्षी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांना यंदाचा साहित्यव्रती पुरस्कार प्रदान करतांना आम्हाला अभिमान वाटत आहे. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांची साहित्यसेवा, संशोधन कार्य निश्चितच अतुलनिय आहे. वास्तविक ते शासनाच्या पदमश्री पुरस्काराचेच खरेखुरे मानकरी आहेत असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी अमरावती येथे केले. स्व.  सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट. अमरावतीच्या वतीने मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय मराठी वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार वितरण समारंभात डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांना साहित्यव्रती पुरस्कार प्रदान करतांना ते बोलत  होते.

        झाडीबोली साहित्य चळवळ उभी करण्यासाठी सुरूवातीला फार मोठा संघर्ष करावा लागला. कारण प्रवाहाच्या विरूद्ध जाणार्‍या माणसाला अडथळे पार करावे लागतातच. साहित्यिकाला केवळ स्वत:पुरते जगता येत नाही. त्याला स्वत:बरोबरच आपल्या सभोवती असणार्‍या शिक्षित तसेच संतकवी डोमाजी कापगते यांच्यासारख्या अल्पशिक्षित प्रतिभावंतांना ओळखून त्यांंना पुढे आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागते. हा पुरस्कार मी उभारलेल्या चळवळीला नक्कीच प्रेरणा देणारा असून हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण झाडीबोली चळवळीचा आहे.अशी प्रतिक्रिया डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली. याचवेळी डॉ. शिवाजी शिंदे (सोलापूर), कविता मोरवणकर (रत्नागिरी), मोहन काळे (नवी मुंबई), रश्मी पदवाड (नागपूर), प्रभु राजगडकर (गडचिरोली), क्षितिज देसाई (ठाणे), डॉ. बबन नाखले / डॉ. अरूण मानकर (नागपूर), नयन पहाड (शिरजगांव) यांना त्यांच्या विविध उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कृत करण्यात आले. शाल, स्मृतीचिन्ह आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.         अमरावती येथील पी.एन.पोटे महाविद्यालयात दि.३० मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात स्थानिक अमरावती येथील प्रतिवंतांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पी.आर.पोटे पाटील शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. पी. एन. खोडके तर प्रमुख अतिथी म्हणून माजी संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री प्रवीण पोटे, ज्येष्ठ समिक्षक डॉ. मनोज तायडे, संस्थासचिव श्रेयस पोटे व सत्कारमूर्ती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्री. हरिश्चंद्र बोरकर आपले सहकारी ताराचंद कापगते व वामन पात्रीकर यांच्यासह उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल झाडीबोली साहित्यिक, लोककलावंत आणि साहित्य व कला क्षेत्रातील डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्राचार्या डाॅ.शोभा रोकडे तर सूत्रसंचालन अॅड. प्राजक्ता राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्या डाॅ.अनुप्रिता देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. कुमार बोबडे, डॉ. पंकज वानखडे, विशाल मोहोड, संदीप देशमुख व सर्व समिती सदस्य यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या