धर्मापुरीच्या बालवाडीतील विद्यार्थी झाला वैद्यकीय अधिकारी
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या तीन गुणांची सोबत असली तर आयुष्य कसे बदलते. परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि स्वप्न उराशी बाळगले तर ते स्वप्न साकार करण्याकरिता वेळ लागत नाही. अत्यंत बिकट परिस्थितीतूनही आयुष्याला कशी कलाटणी येऊ शकते आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चीज कसे करता येते हे अत्यंत बिकट परिस्थितीतून समोर आलेल्या डॉ. कृष्णकुमार यांनी दाखवून दिले. वडील गणपतराव आणि आई शारदा मेश्राम यांचे कृष्णकुमार चिरंजीव. कृष्णकुमार म्हणजे आजचे साकोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी. डॉ. कृष्णकुमार गणपत मेश्राम, रेंगेपार ( कोहोळी ) त. लाखांदूर, धर्मापुरी ( कुंभली ) त. साकोली तसेच साकोली येथील पंचशील वार्ड असा त्यांच्या आई-वडिलांचा झालेला जीवन प्रवास. शेळीपालन, वनमजुरी, रोहयो कामे, टेर्लरकी आणि पोटासाठी जी कामे करता येईल ते गणपत आणि शारदा या दाम्पत्यांनी आपल्या कुटुंबासाठी केले. हलाखीची परिस्थिती असतांनासुद्धा या कुटुंबांनी हुशार कृष्णाला कुठेही कमी पडू दिले नाही. भविष्यात आपला मुलगा आपली परिस्थिती बदलेल हे आई-वडिलांनी स्वप्न उराशी बाळगले आणि ते स्वप्न कृष्णाने साकार केले. साकोली तालुक्यातील धर्मापुरी ( कुंभली ) येथील त्यावेळच्या बालवाडीतील कृष्णकुमार हे विद्यार्थी. धर्मापुरी सारख्या ठिकाणी बालपण घालवलेल्या कृष्णाने नंतर साकोलीतील सेकंडरी एज्युएशन सोसायटीचे प्राथमिक, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय गाठले. (आताचे नंदलाल पाटील कापगते तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय ) २१ सप्टेंबर १९८४ रोजी धर्मपुरी येथे जन्मास आलेले कृष्णा यांनी नंतर आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर एक एक शिखर पादक्रांत केले. सुरुवातीलाच बुद्धीच्या जोरावर कृष्णाने चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत केवळ भंडारा जिल्ह्यातून नव्हे तर विदर्भातून प्रथम येण्याचा मान आपल्या शाळेला, तालुक्याला मिळवून दिला. दहावीमध्ये ७८ आणि बारावी परीक्षेत पीएमटी सह ८२ टक्के प्राप्त करून तो एमबीबीएससाठी पात्र ठरला. मुंबई येथे प्राथमिक प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २००२ वर्षी प्रवेश मिळाला. त्यानंतर २०१२ डीसीपीला ( डिप्लोमा क्लीनिकल पॅथॉलॉजी ) येथे प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यावेळचा कृष्णा म्हणजे आज डॉ. कृष्णकुमार गणपत मेश्राम. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, डीसीपी ( पॅथॉलॉजी ) म्हणून नावारुपास आले. यापूर्वी २००८ ते २०११ दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत येणाऱ्या फुटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉ. कृष्णा यांनी आपली वैद्यकीय सेवा सुरू केली. या दरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक्स. लेक्चरर म्हणूनही सेवा दिली. तदनंतर गडचिरोली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय वडसा येथेही वैद्यकीय अधिकारी म्हणूनच सेवा दिली. आज ते साकोली सारख्या शहराच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
___________________________________________
माझ्या त्या वेळच्या परिस्थितीत माझ्या आई-वडिलांचा भक्कम आधार असला तरी माझे भागडी त. लाखांदूर येथील आणि सध्या नागपूर येथे कार्यरत असलेले माझे मामा नामदेव लक्ष्मण शहारे आणि मामी यांचे फार मोठे श्रेय आहे. गावाच्या पलीकडे कधीही गेलो नसतांना मुंबई, नागपूर येथील एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया करीता त्यांचा फार मोठा हातभार लागला. एमबीबीएस करतांना नागपूर सारख्या शहरात त्यांनी शहरीकरणाचे धडे शिकविले.
त्यांची योग्य वेळेतील मदत माझ्या करिता अनमोल ठेवा आहे. इतकेच नव्हे तर माझ्या गुरुजनांसह साकोलीतील अनेक मान्यवराचे मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान लाभले ते मी कधी विसरू शकत नाही. त्यांचे भरीव योगदान माझ्या काळजात नेहमीसाठी साठवलेले आहे.
डॉ. कृष्णकुमार गणपत मेश्राम.
वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय साकोली.
______________________________________________
कृष्णाने आपल्या तल्लक बुद्धीच्या भरवशावर हे यश संपादन केले. कृष्णाने आपल्या यशात मला सहभागी करून घेतले हा त्याचा मोठेपणा आहे. मामा म्हणून मला जे काही त्यासाठी करता आले ते मी माझे कर्तव्य म्हणून केले. परंतु कृष्णाच्या या वाटचालीमध्ये माझे साकोली येथील मित्र पत्रकार रवि भोंगाने यांचे प्रचंड योगदान आहे. त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कृष्णा यांचा एमबीबीएसचा त्या काळी खऱ्या अर्थाने मोकळा झाला हे मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते. त्यांचा उल्लेख टाळणे म्हणजे माझ्यासाठी ती कृतघ्नता ठरेल. मी कृतज्ञतेच राहू इच्छितो.
नामदेव लक्ष्मण शहारे.
बेलदार नगर, नरसाळा रोड,( दिघोरी ) नागपूर.


0 टिप्पण्या