श्री.श्री.१००८ प.पु. डॉ.धनेश्वर गुरु मधुसूदन भारती महाराज दत्तशिखर संस्थानचे नवे उत्ताधिकारी
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर – हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्तशिखर संस्थानचे महंत श्री श्री १००८ मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती हे दिनांक ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने दत्तवासी झाले. त्यांचे अंत्यसंस्कार आज दि. ५ एप्रिल दुपारी ३ वाजता दत्तशिखर संस्थान येथे साधू संतांच्या व लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित सन्याशी परंपरे प्रमाणे देवा दत्ता दत्त्ता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबराच्या गजरात वेद मंत्राच्या गजरात करण्यात आले. दत्तशिखर संस्थान परंपरेनुसार व संस्थानच्या न्यास नोंदणी योजनेनुसार येथील गादी परंपरा असल्याने महंत हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तसेच गादीचे नवे उतराधिकारी निवडल्या शिवाय दत्त लीन झालेल्या महंतांचे अंत्यविधी करता येत नाही अशी धार्मिक परंपरा असल्याने येथील दत्त शिखर संस्थानातील मोठे घोडेघर, लहान घोडेघर, मोठे हवेली घर , लहान हवेली घर या घरातून प्रत्येकी एक प्रतिनिधी या पदासाठी पात्र असतात त्या सन्याशी साधू मधून एकाची उत्तराधिकारी म्हणून निवड करावयाची असते. त्यानुसार आज दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास दत्तशिखर येथे माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी लाखो भाविक व हिंदू धर्मीय विविध आखड्याचे प्रतिनिधी व साधू संत यांच्या निवड प्रकिया राबविली सदर निवड प्रक्रिया ऑनस्क्रीन पद्धतीने राबविली. दत्तशिखर संस्थान गादीचे उतराधिकारी पदासाठी मोठे घोडेघर, लहान घोडेघर व मोठे हवेली घर , लहान हवेली घर मधून १ ) डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती, २) वासुदेव भारती गुरु बळीराम भारती ३) धनराज भारती गुरु शालीग्राम भारती महाराज या तीन सन्याशी साधुनी नामांकनपत्र सादर केले.
त्यामध्ये नामांकन परत घेण्याच्या मुदतीत वासुदेव भारती गुरु बळीराम भारती यांनी नामांकन परत घेतल्याने डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती व धनराज भारती गुरु या दोघांच्या नावाच्या दत्तचिट्ठी तांब्याच्या पवित्र कमंडलुमध्ये टाकून कर्नाटक येथील ५ वर्षाच्या बालक भाविकाच्या हस्ते भगवान दत्तप्रभूच्या समोर दत्तचिट्ठया काढण्यात आल्या.
त्यामध्ये सुरवातीच्या तिन्ही वेळी डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महाराज यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महराज यांची दत्तशिखर संस्थान माहूर चे नवे महंत व उतराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली.
सन्याशी परंपरेप्रमाणे डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती यांचे मुंडन करून पंचामृत स्नान करून तदनंतर भस्मलेपन करून प.पु.श्री.श्री.१००८ डॉ. धनेश्वर गुरु मधुसूदन भारती असे नवे नामकरण करण्यात आले. त्यानंतर दत्तशिखर संस्थानच्या परंपरागत गादीवर त्यांना विराजमान करण्यात आले. त्यानंतर दत्तवासी प.पु. श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज यांना दत्तशिखर मंदिराच्या परिसरात समाधिस्त करण्यात आले.
प.पु.श्री.श्री.१००८ डॉ. धनेश्वर गुरु मधुसूदन भारती संस्थांनचे 31 वे महंत झाले आहेत
दि. १९ एप्रिल रोजी दत्तशिखर संस्थान येथे प.पु. श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज यांची सोळस पूजा आयोजित करण्यात आली असून सर्व साधू संत, महापुरुष व भाविक भक्तांनी महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तशिखर संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या