विद्यमान सरपंच मारोती रेकुलवार यांना जबर धक्का !
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर - दि. २८ रोजी झालेल्या माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत लांजी ग्रामपंचायत च्या प्रभाग क्र. ३ ची निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली असून लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस( अजित पवार) तालुकाध्यक्ष संतोष कोपूलवार यांनी बाजी मारल्याने आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या लांजी ग्रामपंचायतचे सरपंच मारोती रेकुलवार यांना प्रचंड धक्का बसला आहे. लांजी ग्रामपंचायत मधील वार्ड क्र. ३ च्या रिक्त सदस्य पदासाठी सरपंच गटाकडून सौ. अनुसया अविनाश पवार व संतोष कोपुलवार गटाकडून सौ. अनुराधा संतोष कोपुलवार ह्या उमेदवार होत्या दि.२९ रोजी तहसील कार्यालय माहूर येथे झालेल्या मतमोजणीत सरपंच गटाच्या सौ. अनुसया अविनाश पवार यांना ५९ मते, तर संतोष कोपूलवार गटाच्या सौ. अनुराधा संतोष कोपुलवार यांना १२५ मते मिळाली तर नोटाला २ मते मिळाल्याने सौ. अनुराधा संतोष कोपुलवार यांना विजय घोषित करण्यात आले.
आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या लांजी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक सुरुवातीपासूनच लक्षवेधी होती. दोन्ही गटाकडून साम, दाम दंड भेद सह रणनीती आखून निवडणूक लढविण्यात आली. दोन्ही गटाचे प्रमुख मातबर असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लांजी वासींय नागरिकासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले होते.
सरपंचाच्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात गावातील विविध विकासकामा बाबतचे भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत प्रशासन स्तरावर कोपुलवार यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे लांजी येथील जनतेने पोटनिवडणुकीत त्यांच्या बाजूने कौल देऊन एकतर्फी विजय घडवून आणला. तर सरपंच मारोती रेकुलवार यांना अति आत्मविश्वास नडला असून हा विजय म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे मत लांजी येथील सुजाण युवा कार्यकर्ता शुभम बाबूसिंग राठोड यांनी दिली.
तर लांजी च्या सुजान जनतेने प्रभाग क्र. ३ मध्ये माझे किंवा माझ्या परिवाराचे एकही मतदान सुद्धा नसतांना माझ्यावर विश्वास टाकून भरभरून प्रेम दिले व मतदानरुपी आशीर्वादाचा पाउस . त्याचा कधीही विसर न पडू देता नागरिकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहून जनतेचा विश्वास सार्थ ठरविल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतांनाच या विजयाचा किंगमेकर युवा कार्यकर्ता शुभम बाबूसिंग राठोड हाच असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अजित पवार चे तालुकाध्यक्ष संतोष कोपुलवार यांनी सांगितले.


0 टिप्पण्या