श्री रेणुका माता मंदिर परिसरात दररोज 1000 सुवासिनींना साडी चोळी ओटीचे वाटप
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-श्रीक्षेत्र माहूरगड येथे चैत्र महिन्यानिमित्त धार्मिक वातावरणात विश्वशांती व जगाच्या कल्याणासाठी अयुतचंडी महायागाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर महायाग माहूरगड येथील मातृतीर्थ रोडवरील बालाजी मंगल कार्यालय येथे उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडत असून श्री रेणुका माता मंदिर परिसरात सुवासिनींना दररोज एक हजार साडी चोळी ओटीच्या साहित्याचे वाटप होत आहे
श्रीसदगुरु सखाराम महाराज शंकराचार्य संकेश्वर पीठाधीश्वर यांच्या कृपाशीर्वादाने या महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हा महायाग सुरू आहे.या महायागामध्ये श्री जगद्जननी रेणुका माता यांच्या सेवेसाठी नवकुंडात्मक अयुतचंडी याग केला जात असून दररोज चंडीपाठाचे एक हजार अशा एकूण दहा हजार पाठांचे पठण करण्यात येत आहे 251 ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत दशसहस्त्र पाठांतरानंतर सहस्त्र पाठांचे पठण व 21 ब्रह्मावृंदांच्या उपस्थितीत हवन होत असून महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
महायागाच्या यशस्वी आयोजनासाठी टिटवाळा मुंबई येथील शाम जोशी हे नियोजनाची जबाबदारी सांभाळत असून ब्रह्मवृंद व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीरामपूर येथील हरीश पैठणे गुरुजी पार पाडत आहेत. तसेच ग्रामाचार्य म्हणून रवींद्र कान्नव गुरुजी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या धार्मिक सोहळ्यात सहस्रार्चन, कुंकू मार्चन, पुष्पअर्चन, फलाअर्चन, द्रव्याअर्चन, धनअर्चन, हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मणभोजन तसेच नामसंकीर्तन व गायन-वादन सेवा यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चतुर्वेदांचे पारायण महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या विद्वान वेदपाठी ब्राह्मणांच्या उपस्थितीत सुरू आहे.
सदर महायाग श्री भगवती रेणुका मातेंची कृपा अखंड लाभावी व विश्वशांती साध्य व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा संपूर्ण धार्मिक सोहळा विठ्ठल शास्त्री काशिनाथ शास्त्री शिऊरकर यांचे चिरंजीव हर्षद उर्फ बापू शिऊरकर यांच्या अधिपत्याखाली यजमान पुरोहित म्हणून पार पडत आहे. विशेष म्हणजे, या विधीकाळात श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी दररोज एक हजार सुवासिनींना साडी-चोळी व ओटी देऊन सन्मानित करण्यात येत असून, त्यामुळे कार्यक्रमाला अधिकच धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


0 टिप्पण्या