जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर: सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
*उष्णतेची लाट म्हणजे काय?*
हवामान खात्याच्या निकषानुसार, एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्या भागात 'उष्णतेची लाट' आली असे संबोधले जाते. उन्हाळ्याच्या काळात 'सन बर्न', 'हिट क्रॅम्प्स' (स्नायूंना गोळे येणे), 'हिट एक्झोर्शन' (प्रचंड थकवा) आणि 'हिट स्ट्रोक' (उष्माघात) यांसारखे आजार उद्भवू शकतात.
*उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला?*
उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर व शेतकरी.
वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले.
गरोदर महिला व स्थूल व्यक्ती.
मधुमेह, हृदयविकार असलेले रुग्ण किंवा अपुरी झोप घेणारे लोक.
कारखान्यात बॉयलरजवळ काम करणारे कामगार.
*उष्माघाताची लक्षणे*
किरकोळ लक्षणे: प्रचंड थकवा जाणवणे, ताप येणे, शरीरावर पुरळ उमटणे, चक्कर येणे किंवा हाता-पायांच्या स्नायूंना गोळे येणे.
गंभीर लक्षणे: त्वचा गरम व कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, नाडीचे ठोके वेगवान होणे, मानसिक बेचैनी किंवा बेशुद्धावस्था येणे.
*प्रतिबंधात्मक उपाय*
काय करावे? : पुरेसे पाणी प्या आणि प्रवासात नेहमी पाणी सोबत ठेवा. पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सैल सुती कपडे वापरा. उन्हात जाताना छत्री, टोपी, चष्मा आणि पादत्राणांचा वापर करा. घर थंड ठेवण्यासाठी वाळ्याचे पडदे, पंखा किंवा कुलरची मदत घ्या. लिंबू सरबत किंवा ओआरएस (ORS) यांसारख्या पेयांचे सेवन करा.
काय करू नये?: शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या बंद वाहनात ठेवू नका. मद्यपान, चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. अधिक प्रथिनांचे किंवा शिळे अन्न खाऊ नका.
*तातडीचे उपचार घ्या*
एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाल्यास, त्या रुग्णाला तातडीने सावलीत किंवा हवेशीर खोलीत हलवावे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास वेळ न घालवता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.
*आरोग्य विभागामार्फत सज्जता*
उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता, जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. १ मार्चपासूनच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये २ खाटा राखीव असून औषधसाठा, पंखे, कुलर आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन जनजागृती केली जात आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास घाबरून न जाता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
*****


0 टिप्पण्या