Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल प्रकरणांवर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : साकोली नगरपरिषद हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रलंबित घरकुल प्रकरणांना तात्काळ मंजुरी देण्याची मागणी करत गटनेता संदीप वासुदेव बावनकुळे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०२५-२६ मध्ये मोजणी झालेल्या अनेक लाभार्थ्यांची घरकुल प्रकरणे अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी शासनाच्या सर्व अटी व निकष पूर्ण करूनही मंजुरी मिळालेली नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या १० मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देणे अपेक्षित असूनही अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये एकूण २१० लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २ कोटी १० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या १४१ प्रस्तावांपैकी १३५ लाभार्थ्यांचे अर्ज मान्य करण्यात येऊन सन २०२५-२६ मध्ये एकूण १४ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, सन २०२५-२६ मध्ये एकूण ३३७ लाभार्थ्यांची मोजणी करण्यात आली असून त्यापैकी १२८ लाभार्थ्यांना पट्टे वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना देखील लवकरात लवकर पट्टे देण्यात यावे व उर्वरित घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकित असलेले हप्ते  त्वरित अदा करण्यात यावे  मागणी करण्यात आली आहे. महत्वाचा मुद्दा मांडत बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या २० ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार तसेच १० मार्च २०२६  च्या शासन निर्णयानुसार, गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकामासाठी पात्र ठरविण्याची स्पष्ट तरतूद आहे. या शासन निर्णयामुळे अनेक वंचित लाभार्थ्यांना  योजनेच्या लाभ होईल असे प्रकरणे त्वरीत तयार करुन मंजुरी द्यावी. तसेच आपल्या कार्यालयामध्ये आलेल्या नवीन अर्जांची पडताळणी करून संबंधित लाभार्थ्यांच्या घरकुल व पट्टे प्रकरणांची सखोल पडताळणी करून मोक्का (स्थळ) चौकशी करण्यात यावी व पात्र प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावीत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गटनेता संदीप वासुदेव बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे सर्व प्रलंबित घरकुल प्रकरणांना तात्काळ मंजुरी देऊन पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, तसेच शासनाच्या योजनेचा उद्देश पूर्णत्वास जावा, अशी ठाम मागणी केली आहे.नगरपरिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या