रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-मांढळ येथील नवदुर्गा सभागृहात हरिनामाच्या गजरात एक आगळावेगळा आणि भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध युवा कीर्तनकार पौर्णिमा श्रीकृष्णजी इटनकर आणि सौरभ खुशालजी चांदेवार साकोली यांचा विवाह सोहळा विठ्ठल नामाच्या साक्षीने अत्यंत उत्साहपूर्ण व आध्यात्मिक वातावरणात पार पडला. गेल्या दशकभरापासून पौर्णिमा इटनकर या महाराष्ट्रातील विविध भागांत कीर्तन, प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. आपल्या ओजस्वी वाणीने, हरिभक्तीच्या संदेशाने आणि संस्कारमूल्यांच्या जपणुकीमुळे त्यांनी अल्पावधीतच भक्तांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत समाजात अध्यात्म, संस्कार आणि भक्तीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्यातही याच संस्कारांची आणि भक्तीची प्रचिती पाहायला मिळाली. हातात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, मुखी “विठ्ठल विठ्ठल” नामाचा अखंड गजर आणि सोबत भजन मंडळी, टाळ, मृदुंग व ढोलकीच्या सुरांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. वधूची पालखी हरिनामाच्या जयघोषात विवाह मंचावर दाखल होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आजच्या आधुनिक विवाह सोहळ्यांमध्ये डीजे, फटाके आणि मोठ्या आवाजाच्या गोंगाटावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असताना, इटनकर आणि चांदेवार परिवाराने साधेपणा, संस्कार आणि भक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर विशेष छाप पाडली. या भक्तिमय विवाह सोहळ्याची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, समाजात संस्कारप्रधान आणि अध्यात्मिक विवाह पद्धतीचा एक प्रेरणादायी संदेश या निमित्ताने देण्यात आला.


0 टिप्पण्या