चित्रा न्युज प्रतिनिधी
यवतमाळ:- उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे गोवंश तस्करी रोखण्यासाठी पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गो तस्करांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे राहणार वडद, तालुका महागाव असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे.
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो पीकअपमधून १८ ते २० गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. बिजोरा टोल नाक्यावर वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता तस्करांनी वाहन भरधाव पळवले. त्यानंतर गजानन सुरोशे यांनी एस-क्रॉस कारमधून पाठलाग सुरू केला. सुकळी गावात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगड व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. वाहनाची तोडफोड करून गजानन सुरोशे यांना बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
- घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सुकळी व महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई व ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून गजानन सुरोशे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, नागपूर-तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत पोलिस प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


0 टिप्पण्या