चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-प्रकृतीच्या कुशीत, शीतल चांदण्याची रात्र, शांत-निरव वातावरण, मंद-मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळका, रात्री किड्यांचे व विविध पक्ष्यांचे आवाज यांनी गुंजणाऱ्या रमणीय तलावाच्या काठावर, चारही बाजूंनी दाट जंगलांनी वेढलेल्या मचानावर बसून रात्रभर प्राणी गणना करत निसर्गाचा अनुभव घेणे हा स्वतःतच एक साहसपूर्ण,रोमांचक,सुखद आणि अविस्मरणीय अनुभव असतो.
वनविभागामार्फत पांगळी जंगलातील तलावावरील मचानावर १ मे २०२६ रोजी प्राणी गणना व निसर्ग अनुभव घेताना निसर्गप्रेमी ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष मो. सईद शेख यांनी सांगितले की, ते तसेच त्यांचे सहकारी अतुल वर्मा, मेहुल वर्मा व वनरक्षक गार्ड यांच्यासह सायंकाळी चिचोली गेटपासून सुमारे १० कि.मी. दाट जंगलातून, कठीण मार्ग पार करत तलावाजवळील सुमारे ५० फूट उंच मचानावर पोहोचले. रात्रीचे भोजन केल्यानंतर निरीक्षण सुरू करण्यात आले.
जंगलात मोर, चितळ तसेच विविध प्राणी व पक्ष्यांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुग्धधवल चंद्रमा आपली पूर्ण आभा व प्रकाश चारही दिशांना पसरवत होता. येथे वाघ, दोन काळे बिबट (गतवर्षी लेंडेझरी जंगल परिसरात दिसल्याचे सांगितले जाते), हरिण, सांबर, चितळ, गवा (बायसन), अस्वल अशा अनेक प्राणी व पक्ष्यांची मोठी संख्या आढळते. मोर, चितळ, हरिण तसेच अनेक पक्षी प्रत्यक्ष पाहायला मिळाले. लेंडेझरी जंगल परिसरात सुमारे १० ते १२ जंगली गवे (बायसन) चरण करताना दिसले.
मात्र याहूनही अधिक या ठिकाणची नैसर्गिक सुंदरता, शांत व रमणीय जंगलांचे दृश्य निसर्गप्रेमींसाठी रहस्यमय व जादुई सुकून देणारे वातावरण निर्माण करते. तलावाच्या काठावरील मचानावर बसून तासन्तास निसर्गाचे निरीक्षण करता येते. हा तलाव वन्यजीवांसाठी जीवनरेखा असून, भविष्यात त्याची अधिक खोली वाढवून जलसाठ्यात वाढ करणे आवश्यक आहे. तसेच येथील दाट जंगलांचे आगीपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
“पांगळी तलावावर शहरातील गोंगाट व गर्दीपासून दूर जाऊन निसर्गासोबत एकांत अनुभवता येतो,” असे अतुल वर्मा यांनी आपला अनुभव व्यक्त करत सांगितले.
मान्सूनच्या काळात संपूर्ण जंगल सजीव होते व सर्वत्र हिरवाई पसरते, ज्यामुळे परिसर अधिकच मनोहारी दिसतो.हा एक *मिनी नैनीताल* आहे असे म्हंटले तर वावगे होणार नाही, निसर्गाच्या सान्निध्यात शांतता व समाधानाचे क्षण अनुभवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मात्र वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन निसर्गाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.
या उपक्रमासाठी वनविभाग भंडारा येथील उपवनसंरक्षक श्री. सिंग, सहाय्यक वनसंरक्षक श्री. रितेश भोंगाडे, नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन रामटेके, राऊंड ऑफिसर श्री. जे. एस. बेले व वनरक्षक श्री. राजकुमार कुंभरे यांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या