सर्वपक्षीय मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : नीट व टीईटी पेपरफुटीतील कथित गैरव्यवहार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी भद्रावती शहरात गरुवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. बंदला शहरातील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या आंदोलनाची विशेष बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तर काँग्रेस पक्षाने स्वतंत्र मोर्चा काढून निषेधाचे फलक हातात घेऊन शहरातून रॅली काढली. त्यामुळे शहरात दोन मोर्चे निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
मोर्चात वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दोन्ही मोर्चे शहरातील मुख्य मार्गाने जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नीट व टीईटी पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात सहभागी प्रमुख नेते प्रवीण काकडे, राजू गैनवार, डॉ. अमित नगराळे, विकास दुर्योधन, सुरज गावंडे, फयाज शेख, ज्ञानेश्वर डुकरे, नंदु पढाल,सुयोग भोयर,अनिल पडोळे,जाधव ताई,सचिन नक्षिणे,आशीष कार्लेकर, संतोष रामटेके, सुमित हस्तक, विशाल बोरकर, नरेश काळे,प्रविण काकडे, बबलु शेख, छोटू धकाते, आशीष देहारकर, रितेश वाढई, सरिता सुर, सुनिता खंडाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वपक्षीय मोर्चामुळे शहरात दिवसभर आंदोलनाचे वातावरण होते. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.


0 टिप्पण्या