भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध जहाल क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या दि.२३ जुलै २०२६ ला असलेल्या १२० व्या जयंतीनिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
" चंद्रशेखर आझाद
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि युवाक्रांतीचे प्रेरणास्थान "
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध जहाल क्रांतिकारक धगधगते अग्निकुंड आणि युवाक्रांतीचे प्रेरणास्थान असलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्या दि.२३ जुलै २०२६ ला असलेल्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
चंद्रशेखर आझाद
यांचा जन्म दि.२३ जुलै १९०६ रोजी मध्यप्रदेशातील 'भाभरा' या छोट्या गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते.त्यांचे मूळ नाव 'चंद्रशेखर सीताराम तिवारी' असे होते.त्यांचे बालपण भिल्ल बालकांसोबत जंगलात गेले, त्यामुळे ते धनुष्यबाण चालवण्यात निष्णात झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण भाभरा येथे झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना वाराणसी (काशी) येथे पाठवण्यात आले.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी महात्मा गांधींच्या 'असहकार चळवळीत' सहभाग घेतला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायाधीशांसमोर हजर केले.न्यायाधीशांनी नाव विचारल्यावर त्यांनी मोठ्या अभिमानाने आपले नाव 'आझाद' (मुक्त) असे सांगितले.वडिलांचे नाव विचारल्यावर त्यांनी 'स्वतंत्रता' आणि घराचा पत्ता 'तुरुंग' असे सांगितले.या उत्तरामुळे चिडलेल्या न्यायाधीशांनी त्यांना १५ बेतांचे फटके मारण्याची शिक्षा सुनावली.
प्रत्येक फटक्यासरशी त्यांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.या घटनेनंतर संपूर्ण देश त्यांना 'चंद्रशेखर आझाद' या नावाने ओळखू लागला.
असहकार चळवळ स्थगीत झाल्यानंतर त्यांचा अहिंसेवरील विश्वास उडाला आणि ते सशस्त्र क्रांतीकडे वळाले.ते 'हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन' (HRA) या क्रांतिकारी संघटनेत सामील झाले.
रामप्रसाद बिस्मिल यांच्या फाशीनंतर त्यांनी या संघटनेची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली.
काकोरी कट (Kakori Train Action) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र बंड करण्यासाठी घडवून आणलेला एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक दरोडा होता,ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.उत्तर प्रदेश सरकारने याचे नाव बदलून काकोरी ट्रेन अॅक्शन असे केले आहे.हा कट हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेने रचला होता.ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे खरेदी करायची होती, ज्यासाठी निधीची खूप आवश्यकता होती.सामान्य भारतीय जनतेला न लुटता, ब्रिटिशांनी भारतीयांकडून कराच्या रुपाने गोळा केलेला सरकारी खजिना लुटण्याचा निर्णय घेण्यात आला.दि.९ ऑगस्ट १९२५ ला उत्तर प्रदेशातील लखनौ जवळील काकोरी नावाचे रेल्वे स्थानक आहे.सहारनपूरहून लखनौकडे जाणाऱ्या ८ नंबर डाऊन ट्रेनमध्ये क्रांतिकारी बसले होते. काकोरी स्टेशनजवळ क्रांतिकारकांनी आपत्कालीन साखळी (Chain) ओढून गाडी थांबवली आणि गार्डच्या डब्यात असलेली सरकारी खजिन्याची तिजोरी फोडून क्रांतिकारकांनी सुमारे ८,००० रुपये लुटले आणि जंगलात पसार झाले.ही संपूर्ण कामगिरी अवघ्या १० ते १५ मिनिटांत पार पडली. रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांच्यासोबत चंद्रशेखर आझाद हे या कटाचे प्रमुख सूत्रधार आणि योद्धे होते. प्रत्यक्ष रेल्वे लुटताना त्यांनी आपल्या साथीदारांना सुरक्षा कवच (कव्हर फायर) दिले. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने मोठी शोधमोहीम राबवून अनेक क्रांतिकारकांना अटक केली. मात्र चंद्रशेखर आझाद वेषांतर करण्यात आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी होण्यात यशस्वी झाले.ते एकमेव प्रमुख क्रांतिकारक असे होते की,जे पोलिसांच्या हाती कधीच सापडले नाहीत. काकोरी खटल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी भूमिगत राहून क्रांतिकारकांना पुन्हा एकत्र केले आणि
पुढे जाऊन भगतसिंग यांच्यासोबत 'हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' (HSRA) ची स्थापना केली.या घटनेत झालेल्या गोळीबारात एका प्रवाशाचा चुकून मृत्यू झाल्याने ब्रिटिश सरकारने क्रांतिकारकांवर हत्येचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान,रोशन सिंग आणि राजेंद्रनाथ लाहिडी या चार प्रमुख क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा सुनावली.सचिंद्रनाथ सन्याल आणि सचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्या पाण्याची (अंदमान) शिक्षा झाली, तर इतरांना दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली.या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण देशभरात क्रांतीची एक नवीन लाट निर्माण झाली.
लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी भगतसिंगांसोबत ब्रिटिश अधिकारी 'सॉंडर्स'च्या वधाची योजना आखली.ते वेशांतर करण्यात अत्यंत पटाईत होते,त्यामुळे अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते निसटले.त्यांनी प्रतिज्ञा केली होती की, मी जिवंतपणी कधीही ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागणार नाही. दि.२७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबादच्या (आताचे प्रयागराज) 'अल्फ्रेड पार्क' मध्ये ते आपल्या सहकाऱ्याला भेटायला गेले होते.एका फितुराने दिलेल्या माहितीमुळे ब्रिटिश पोलिसांनी अल्फ्रेड पार्कला चारही बाजूंनी वेढले.आझाद यांनी एकट्याने झाडाचा आडोसा घेऊन अनेक पोलिसांना यमसदनास पाठवले.अत्यंत शूरपणे लढताना त्यांच्या पिस्तुलात शेवटची एकच गोळी शिल्लक राहिली.
आपली प्रतिज्ञा पाळण्यासाठी त्यांनी ती शेवटची गोळी स्वतःच्या कपाळावर झाडून घेतली आणि वीरमरण पत्करले.वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी या महान सुपुत्राने भारतमातेच्या चरणी आपले प्राण अर्पण केले.त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात क्रांतीची एक नवीन लाट उसळली.ज्या पार्कमध्ये त्यांनी बलिदान दिले,त्याचे नाव बदलून आता 'चंद्रशेखर आझाद पार्क' असे ठेवण्यात आले आहे.त्यांचे शौर्य आणि 'आझाद' राहण्याची जिद्द आजही करोडो भारतीय तरुणांना देशप्रेमाची प्रेरणा देते.अशा या जहाल क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
डॉ.हरिवंशराय बच्चन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९


0 टिप्पण्या