Ticker

6/recent/ticker-posts

गजानन चव्हाण यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

नायगाव विधानसभा मतदारसंघाला नवे राजकीय बळ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन
==============

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:-नायगाव विधानसभा मतदारसंघात जनसेवा, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे 89 नायगाव विधानसभा मदारसंघाचे उमेदवार व शिवसैनिक नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी बुधवारी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विरार येथील निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चव्हाण यांनी शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करीत चव्हाण यांनी शिंदे शिवसेनेचा भगवा स्वीकारला. नायगाव विधानसभा मतदारसंघात विकासाला गती देण्यासाठी तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

*समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश*

गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी सरपंच किशोर महाराज, युवा नेते व नगरसेवक पंकज तंतरपाळे, लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बालाजी आळंदीकर, युवा नेते संजय गुजलवार, गणेश देगावे, प्रदीप शिंदे, मिलिंद एडके, पांडुरंग कांबळे, शैलेश कांबळे, अशोक राचुरे, शुभम लाडके, विठ्ठल बोरीकर, प्रमोद बिरेवार, किरण मोरे, माधव चव्हाण, माधव कुडके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

*दिग्गज नेत्यांची उपस्थिती*

प्रवेश सोहळ्यास आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरराव धोंडगे, मुखेड विधानसभा मतदारसंघातील नेते बालाजी पाटील खतगावकर, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांत मढवी, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

गजानन चव्हाण यांच्या प्रवेशामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या संघटन विस्ताराला चालना मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात मतदारसंघात पक्षाची बांधणी अधिक आक्रमकपणे करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या