Ticker

6/recent/ticker-posts

विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल – राज्यपाल जिष्णु देव वर्मा


‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवनात आठ राज्यांसह पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन सोहळा उत्साहात

चित्रा न्युज ब्युरो 

मुंबई : भारतातील भाषा, रूढी, परंपरा आणि संस्कृती वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची भावना सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. नागरिकांनी देशाच्या विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती जाणून घ्यावी, स्थानिक नागरिकांशी संवाद साधावा. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपालांनी संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताची विविधता अधोरेखित करताना राज्यपाल म्हणाले की, भारतातील विविध राज्ये ही विविधरंगी सुंदर फुलांप्रमाणे आहेत. या सर्व फुलांमधून भारताचा भव्य आणि सुंदर पुष्पगुच्छ साकारला आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने देशाच्या सामायिक सांस्कृतिक वारशात तसेच राष्ट्रीय प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

देशातील विविधतेचा आदर राखत एकमेकांच्या संस्कृतीतून शिकणे, परस्परांमधील मतभेदांच्या पलीकडे जाऊन बंधुभाव वाढविणे आणि समृद्ध, एकसंध भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक संकल्प करणे आवश्यक आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही राज्यपालांनी यावेळी नमूद केले.

या सोहळ्याच्या माध्यमातून विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधोरेखित करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या