दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
परभणी :- जितूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील सुप्रसिध्द कुलदैवत मल्हार मार्तंड खंडोबा देवाच्या मंदिरात मंगळवारी(दि.29) चंपाषष्ठीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सदानंदाचा विजय असो! यळकोट-यळकोट जय मल्हार! च्या जयघोषात भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले.
तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून येथे मोठ्या भक्तिभावाने चंपाषष्ठीचा सण साजरा करण्यात येतो. हा सण मोठ्या भक्तिभावे आणि भंडाराची उधळण करत साजरा करण्यात आला. कुलदैवत मल्हार मार्तंड खंडोबा देवाच्या मंदिरात गेल्या सहा दिवसापासून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीष शुद्ध चंपाषष्ठीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिला भजनी मंडळ आणि भाविकांच्या वतीने हरिनाम जप आयोजन करण्यात आले होते.यावेळी जागरण आणि गोंधळ करण्यात आला. आपल्या कुलदैवताचे देवकार्य करण्यासाठी भाविकांनी मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.मंदिर परिसर विविध फुलांनी सजविण्यात आला होता.
मार्तंड भैरवाची चंपाषष्ठीची आख्यायिका देखील यावेळी गौरविण्यात आली. आजचे कुलदैवत असलेले खंडोबा देवाची चंपाषष्ठीच्या दिवसाची एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, कृतयुगात मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हा वर दिला होता. त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले आणि ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवाकडे मदत मागितली. भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवा चे रूप घेऊन कार्तिकेयासह ते मणि आणि मल्ल या राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फाडून त्याला जमिनदोस्त केले. तोच हा चंपाषष्ठीचा दिवस. यानिमित्ताने खंडोबा देवाच्या मंदिरात आजच्या दिवशी बाजरीचा पानगा आणि वांग्याचे भरीत यांचा नैवेद्य खंडोबा देवास दाखवला जातो. प्रत्येकाच्या घरी मंगळवारी मोठ्या उत्साहात चंपासष्ठीचा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या