सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाव्दारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बि बियाने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. तसेच विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सुगी हंगामाच्यावेळी बाजारपेठेत शेतमालाची आवाक जास्त होत असल्याने शेतक-यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशा वेळेस कृषि मालाच्या साठवणूकीस प्राधान्य देऊन गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती औद्यागिक मालाची साठवण केली जाते. मालाची साठवण केलेल्या ठेवीची पावती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना त्वरीत कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतक-यांना हंगामात अर्थसहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत साठवणूकीची सोय उपलब्ध होते.
शेतक-यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित वाठवण दराच्या 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षित करण्यात येते. याशिवाय प्रत्येक पंधरवाड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करुन माल सुरक्षित ठेवण्यात येतो. सर्व मालाला विमा सरंक्षण दिल्या जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई सुध्दा देण्यात येते.
याशिवाय वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन राबविण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावती वरील शेतमालाच्या किमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा 10 लाख प्रती शेतकरी व 75 लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे.
महामंडळाच्या गोदामात साठवणूकीस ठेवण्यात येणा-या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाईन तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने शेतकरी ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सुगीच्या काळात व्यापा-यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन वखार महामंडळाच्या अधिक्षकांनी केले आहे.


0 टिप्पण्या