Ticker

6/recent/ticker-posts

गोवर-रुबेलाचा संसर्ग थांबविण्यासाठी नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करावे

जिल्हाधिकारी अमोल येडगे

लसीकरण मोहीमचे पहिला टप्पा 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर तर 15 जानेवारी ते 25 जानेवारी दुसरा टप्पा राबविणार 


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

यवतमाळ: महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात तसेच देशातील काही राज्यांमध्ये गोवर रूबेला या संसर्गजन्य आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्यात. नऊ महिने ते पाच वर्ष या वयोगटातील पहिला व दुसरा डोस न घेतलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. 

आज जिल्हाधिकारी यांच्या कक्षात गोवर प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण,शिक्षणाधिकरी प्रमोद सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी
डॉ प्रेमकुमार ठोंभरे, बालरोगतज्ञ संघटनेचे डॉ स्वाती पाटिल, एस. एम.ओ डॉ एस. आर.ठोसर, डॉ विजय अग्रवाल, डॉ. प्रिती दुधे, डॉ एम तागडपल्लिवार, डॉ रमा बाजोरिया उपस्थीत होत्या. 

गोवर रूबेला लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. लसीकरणामुळे गोवर या आजाराशी लढण्यासाठी बालकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते तसेच आजाराचे गंभीर परिणाम बालकांवर दिसून येणार नाहीत. पूर्वी घेतलेल्या मोहिमेत सुटलेले बालक आणि नव्याने जन्माला आलेल्या बालकांमध्ये ज्यांना अद्याप लसीकरण झालेलं नाही, पहिला व दुसरा डोस देण्यात आलेला नाही, अशा सर्व नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. 
लसीकरण मोहीमेचा पहिला टप्पा 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर तर 15 जानेवारी ते 25 जानेवारी हा दुसरा टप्पा राबविण्यात यावा असे श्री येडगे यांनी सांगितले. 

शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची सर्व माहिती अंगणवाडी व आशा सेविकांकडे उपलब्ध आहे. त्यामधून लस घेतलेली बालके आणि न घेतलेली बालके, तसेच पहिला व दुसरा डोस घेतलेली बालके, केवळ पहिला डोस घेतलेली किंवा केवळ दुसरा डोस घेतलेली बालके असे वर्गीकरण करून माहिती तयार करण्यात यावी. या माहितीनुसार लसीकरणाचा आराखडा तयार करण्यात यावा. 

खाजगी शाळेत गोवर रूबेलाचे रुग्ण आढळत असतील तर त्यांना प्रशासनाला अहवाल सादर करण्यास कळवावे. तसेच कोणत्याही शाळेतील बालक गैरहजर राहत असल्यास गैरहजर बालकाची माहिती घेण्यात यावी. लसीकरण करण्यासंदर्भात पालकांना जागृत करावे आणि लसीकरणाचे फायदे त्यांना व्यवस्थित समजावून सांगावेत. त्याचबरोबर व्हिटामिन ए आणि के या दोन्ही व्हिटामिनची उपलब्धता ठेवण्यात यावी,
असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या