- वरिष्ठस्तर न्यायाधीश जयदिप पांडे
लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याबाबत जनजागृती
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
नागपूर :- बालकांचे हित व त्यांचे अधिकारांबाबत उचित तरतूदी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण व लैंगिक दुरुपयोग अपराध असून अपराध करणाऱ्यांवर कडक कारवाई आपश्यक आहे. त्यानुषंगाने कायद्याची निर्मिती करण्यात आली असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदिप पांडे यांनी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सेवासदन सक्षम हायस्कुल बर्डी, येथे ‘लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा, अधिनियम 2015’, ‘चांगला व वाईट स्पर्श’ या विषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदिप पांडे होते. प्राधिकरणाच्या सदस्या ॲड. सुरेखा बोरकुटे, विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यावेळी उपस्थित होते.
बाल न्याय अधिनियम 2000 मध्ये सुधारणा केल्या असून जे लहान मुले गुन्हे करतात. त्यांच्यावर नवीन अधिनियमानुसार गुन्हे दाखल होणार आहे. जेव्हा बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते तेव्हा त्यांच्यासोबत वयाचा दाखला असायला पाहिजे जेणेकरुन त्यांच्या वयाचा पुरावा सादर करता येईल. ज्या 18 वर्षाखालील बालकांनी गुन्हे केले असेल त्यांना कारागृहात न ठेवता निरिक्षण गृहात ठेवायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने बाल्यावस्थेमध्ये गुन्हा केला असेल तर त्याच्या चरित्र्याप्रमाणपत्रामध्ये लिहिता येत नाही की, त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच बालकांसंबंधी प्रकरणे अत्यंत संवेदनशिलतेने हाताळले पाहिजे, असे ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी सांगितले.
एखाद्याने आपणास चांगल्या उद्देशाने स्पर्श केला की वाईट उद्देशानी स्पर्श केला याबाबत जागृत राहायला पाहिजे. त्यासोबतच आपल्या पालकांना किंवा शाळेतील शिक्षक व शिक्षिकांना सांगायला पाहिजे जेणेकरुन त्यांच्यासोबत कुठलीही अनुचीत घटना घडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत सहाय्य व सल्ला योजनांबाबत माहिती देवून उपस्थितांना सांगितले की, आपल्याला वेळोवेळी वेगवेगळया कायदेशिर समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु त्या कायदेशिर समस्या कशाप्रकारे सोडवायाच्या याबाबत कुठलीही माहिती नसते. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्या मोफत कायदेशिर सहाय्य व सल्ला देण्याचे काम करते व मध्यस्थीद्वारे प्रकरणे सोडविता येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थीनींनी विचारलेल्या प्रश्नाचे मान्यवरांनी उत्तरे दिली. जनजागृती कार्यक्रमाचे संचालन सेवासदन सक्षम हायस्कूलच्या शिक्षिका अनुराधा सुळे यांनी केले तर आभार नंदिनी हिरुडकर यांनी मानले. या कार्यक्रमास सेवासदन सक्षम हायस्कुलचे कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधी अधिकारी, कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी व विधी स्वयंसेवक उपस्थित होते.


0 टिप्पण्या