सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : जिल्ह्यातील 9 ते 12 महिने वयोगटातील बालकांना पहिला डोस व 16 ते 24 महिने वयोगटातील सर्व बालकांना दुसरा गोवर रुबेला लसीचा डोस देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान पालकांनी आपल्या बालकांना गोवर लसीचा डोस देऊन बालकांना गोवर आजारापासून सुरक्षित करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्याकरीता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण वेदपाठक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, साथरोगतज्ञ डॉ. विनित झलके आदी उपस्थित होते.
लहान वयात मुलांच्या मृत्युसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये या आजारामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. सन 2015 मध्ये जगभरात जवळपास 1.15 लक्ष मृत्यु हे केवळ गोवर आजारामुळे झाले आहेत. म्हणजे दररोज 667 मृत्यु किंवा दर तासाला 15 मृत्यु जगभरात होत आहेत. त्यामुळे मोहिम दरम्यान आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील 9 महिने ते 12 महिने व 16 ते 24 महिने वयोगटातील बालके पहिल्या व दुस-या डोस पासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन लसीकरण करण्याच्या सूचना राहुल कर्डिले यांनी आरोग्य विभागास केल्या.
रुबेला हा एक संक्रमक सामान्यत: सौम्य व्हायरल संसर्ग असुन तो मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यु किंवा जन्मजात दोष जसे अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय विकृती होऊ शकतो. हे बालक जन्मजात रुबेला सिंड्रोम म्हणुन ओळखले जाते.
बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करुन गोवर आणि रुबेला या दोन आजारापासुन आपल्या बालकांना सुरक्षित करु शकतात. गोवर लसीकरणामुळे सन 2000 पासुन सन 2015 पर्यंत सुमारे 2 करोड गोवरमुळे होणा-या मृत्युना प्रतिबंध लागला असल्याचे त्यांनी सांगितले.


0 टिप्पण्या