एक वैद्यकीय अधिकारी बीडला- तर दुसरे पद रिक्त
गोरख मोरे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड:-आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाडा एकच वैद्यकीय अधिकारी हाकत असल्याचे चित्र दिसून आले आहे. या केंद्रात अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी अनेक महिन्यांपासून एक वैद्यकीय अधिकारी व पुरुष शिपाईचे तीन पद रिक्त असून त्यामुळे शवविच्छेदन करणारा शवविच्छेदक नसल्यामुळे अनेक रुग्णांना मरणानंतर ही मरण यातना सहन कराव्या लागतात कडा आरोग्य केंद्राची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा भार पडला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यात सर्वात मोठे आरोग्य केंद्र असून या ठिकाणी अनेक पदे रिक्त आहेत या केंद्राशी आसपासच्या ३० ते ४० गावाचा संपर्क येत असतो त्यामुळे या ठिकाणी दररोज १५० च्या आसपास रुग्णांची तपासणी केली जात असून आठवडी बाजार दिनी याची संख्या अधिक असते. आष्टी तालूक्यातील कडा हे प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असल्याने या ठिकाणी अपघाती रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात असते. अनेक पद रिक्त असून सध्या एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने अपघात, विषबाधा झालेल्या, सर्पदंश, तसेच प्रयोगशाळा तपासणी, गरोदर माता तपासणी, असंसर्गिक आजार अशा रुग्णांना आरोग्य सेवा देणे कठीण होत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी आष्टी व गटविकास अधिकारी यांना याबाबत सामाजिक कार्यकर्त्यानी वारंवार विनंती करून सुध्दा गेंड्याच्या कातडी पांघरूण घेतलेले अधिकाऱ्यांना मात्र जाग येताना दिसत नाही. आज आमचे प्रतिनिधी सकाळी ११:३० वाजता कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तेथील एकमेव वैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर त्याठिकाणी उपस्थित नव्हते तेव्हा तेथील एका कर्मचाऱ्यांस विचारले असता ते केंद्रातील औषधे आणण्यासाठी बीड येथे गेले असल्याचे सांगितले त्यामुळे याठिकाणी आलेल्या रुग्णांची हाल होतांना दिसत आहे.


0 टिप्पण्या