Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार

• पिंपळगाव/सडक महामार्गावरील घटना 

• पोलिसांत गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून मागेहून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना शनिवारी(ता.७) रात्री ७:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव रमेश बकाराम मेश्राम(४२) चीचटोला, तालुका लाखनी असे आहे. अपघातानंतर जखमीस वैद्यकिय सहाय्यता न पोहचविता किंवा अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. वृत्त लीहिपर्यंत वाहन चालकाचा शोध लागला नव्हता. 
              मृतक गणेश मेश्राम एका खासगी रेस्टॉरेंट मध्ये कामास होता. आपली कामे आटोपून मोटारसायकल क्रमांक एमएच ३६ बी ३६७९ ने रात्री ७:३० वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ने स्वगावाकडे जात असताना पिंपळगाव/सडक येथे मागेहून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने महामार्गावर पडून गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर उपस्थितांनी भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलिस हवालदार सुरेश आत्राम, पोलिस शिपाई लक्ष्मीकांत झलके क्षणाचीही विलंब न करता घटनास्थळी पोहचले. आवश्यक ते सोपास्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाचा भाऊ गणेश मेश्राम याचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३५०/२०२३ कलम २७९, ३०४(अ) भादवि तथा मोटारवाहन कायदा सहकलम १३४(बी), १८४ अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलिस शिपाई पंकज निरगुळे तपास करीत आहेत. मृतकास पत्नी, २ मुले असून मनमिळावू रमेश च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या