• कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराचे संगनमताने साहित्याचा अल्प वापर
• व्यथा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- ग्रामीण परिसरातील रस्त्ते विकासासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्त्यावर आला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्ता खडीकरण कामात कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराचे संगनमताने साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करून बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे.
निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्ता ठिकठिकाणी उखळल्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून आवागमन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. खड्डे चुकवितांना दुचाकी चालकाचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या काही घटना घडल्या. त्यात काहींना अपंगत्वही आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गावकऱ्यांचे मागणीवरून व काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक(एडीबी) अर्थसाहाय्य अंतर्गत निलागोंदी-राजेगाव-बोरगाव-सामेवाडा-पिंपळगाव/सडक रस्ता लांबी १०.७९० किलोमीटर ची दर्जोन्नती करण्याचे काम मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकिय रक्कम ५ कोटी २१ लाख ७८ हजार रुपये होती.
ई-निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट भंडारा येथील एका कंत्राटदारास देण्यात आले असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता शैलेश हरकंडे यांचेकडे सोपविण्यात आले आहे. निलागोंदी गावचे सीमेतून रस्ता खडीकरणाचे काम ३ दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते. सर्वप्रथम रस्त्यावर पडलेले खड्डे समतोल करून जुन्या रस्त्यावरील उखळलेले डांबर काढून खडीकरण करावयास पाहिजे होते. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पण जुन्या रस्त्यावरच अत्यल्प प्रमाणत डांबर टाकून खडी घालण्यात येत आहे. काम सुरू झाल्यापासून कनिष्ठ अभियंत्याने बांधकामास भेट दिली नसल्यामुळे कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याचे संगनमताने तर खडीकरणाचे काम निकृष्ट प्रतीचे केले जात नाही ना ? असा गावकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे. अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्त्याचे काम करण्यात यावे. अशी निलागोंदी ग्रामवासी जनतेकडून मागणी होत आहे.
माहिती व सूचना फलक लावलेला नाही
शासकीय योजनेअंतर्गत विकास कामे करायची झाल्यास कामाचे दर्शनी भागात माहिती व सूचना फलक लावण्यात यावे. अशा शासनाच्या मार्गदर्शन सूचना असून त्यावर कामाचे नाव, आर्थिक वर्ष, कंत्राटदाराचे नाव, अंदाजपत्रकीय रक्कम, एजेंसी चे नाव, ढोबळ नकाशा, साहित्याची मात्रा इत्यादी बाबीचा उल्लेख असणे आवश्यक आहे. पण निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामावर माहिती व सूचना फलक लावण्यात आले नाही.
मजुरांना सुरक्षा उपकरणे पुरविली नाहीत
खडिकरणाचे कामावर गरम डांबर व गिट्टी तसेच चुरी किंवा राखेचा उपयोग करण्यात येत असल्याने खडिकरणाचे काम धोकादायक श्रेणीत मोडते. पण निलागोंदी ते पिंपळगाव/सडक रस्ता खडीकरण कामावरील मजूरांना जुते, हातमोजे, हेलमेट, चष्मा ही सुरक्षा उपकरणे पुरविली गेली नसल्याचे कामावरील मजुरांनी नाव न छापण्याचे अटीवर सांगितले.
0 टिप्पण्या