Ticker

6/recent/ticker-posts

पात्र लाभार्थ्यांना दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेचा लाभ द्यावा


• जि. प. सदस्य विद्या कुंभरे यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- अनुसूचित जातीचे भूमिहीन शेतमजुर कुटुंबाच्या आर्थिक उत्थानासाठी चालविल्या जाणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेचे अनेक पात्र लाभार्थ्यांचे आवेदनास केराची टोपली दाखविण्यात आल्याने अनेक गरजू लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ लाभ देण्यात यावा. अशी मागणी  जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांनी केली आहे. 
         समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीचे भूमिहीन कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर २ एकर बागायती किंवा ४ एकर जिरायती शेतजमीन देण्याचे प्रावधान आहे. सरकारी उपलब्ध नसल्यास खाजगी व्यक्तीकडे खरेदी करूनही लाभार्थ्यांना देण्याची या योजनेत तरतूद करण्यात आली आहे. याकरिता अनेक पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. पण त्यांना लाभ दिला गेला नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना अर्धपोटी राहण्याची पाळी आली आहे. असे जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांचे म्हणणे आहे. 
         स्वर्गीय दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेकरीता अनेक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्याकरिता लागणारे शुल्क अनेक लाभार्थ्यांनी उसनवार घेऊन पूर्तता केली आहे. याकरिता लाभार्थ्यांनी वेळ आणि आवश्यक त्या ठिकाणी पैसाही खर्च केला आहे. पण लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकाराने समाजकल्याण विभाग पर्यायाने शासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता पात्र लाभार्थ्यांना तत्काळ या योजनेचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या