भागडी येथील घटना, रुग्णालयात उपचार सुरू
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- दिवसा ढवळ्या गावात येऊन एक रानडुक्कराने २ युवकांना जखमी केल्याची घटना मंगळवार(ता.९) दुपारी २:०० वाजता दरम्यान भागडी, तालुका लाखांदूर येथे घडली. जखमी युवकांचे नाव सचिन डाकराम दूनेदार(२५), विराज राजकुमार दहीवले(२५) दोघेही राहणार भागडी, तालुका लाखांदूर अशी आहेत. त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरू असून वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली.
विराज दहिवले हा आपले काम आटपुन दुपारी जेवणाच्या सुट्टीत घराकडे जात असताना अचानक रांदुक्कराने पाठी मागुन हल्ला चढविल्याने तो जखमी झाला. त्यानंतर रानडुक्कराने आपला मोर्चा गावाकडे वळविला व सचिन दूनेदार यांचे घरात शिरून त्यास जखमी केले. गावात रानडुक्कर आल्याचे गावकऱ्यांना माहिती होताच आरडा ओरड केल्याने रानडुक्कर गावातील गल्ली गोळात सैरावैरा पळत सुटल्याने काही वेळ गावकऱ्यांची तारांबळ उडाली होती. याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे चार चाकी वाहनाने कार्यकर्त्यांसह जात असतांना त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी जखमींना आपल्या चार चाकी वाहनात बसवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे नेले. वैद्यकिय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी जखमींवर उपचार केले. वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांना या बाबद माहिती होताच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. प्रसंगावधान राखून विनोद ढोरे यांचेसह देवराम कुथे, तेजस भरने, मंगेश मातेरे, गणेश ठाकरे यांनी जखमींना वेळेवर आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहकार्य केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या