• रामा क्रमांक ५३ तेलीनाला(साकोली) येथील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतांना ट्रॅव्हल्सचे उजव्या बाजूचे समोरील चाक महामार्गा खाली उतरल्याने ट्रॅव्हल्स पलटून पती-पत्नी जखमी झाल्याची घटना सोमवार(ता.९) मध्यरात्री दरम्यान तेलीनाला(साकोली) घडली. जखमींचे नाव धर्मेंद्र शिवकुमार सतनामी(३६), गंगोत्री धर्मेंद्र सतनामी(३४) दोघेही रा. खापरीकला, तालुका-लोर्मी, जिल्हा-मुंगेली(छत्तीसगढ) अशी आहेत. त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उर्वरित प्रवाश्यांना आपत्कालीन दरवाज्यातून महामार्ग पोलिसांनी बाहेर काढले. ट्रॅव्हल्स मध्ये ४६ प्रवाशी होते. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आशीर्वाद ट्रॅव्हल्स क्रमांक सिजी ०८ एयु ५४०० ही ट्रॅव्हल्स रायपूर करून नागपूर कडे प्रवाशी घेऊन येत असताना तेलीनाला(साकोली) लगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ट्रॅव्हल्स चालक मुनीर खान हा चुकीच्या पद्धतीने दुसरे वाहनास ओव्हर करीत असताना ट्रॅव्हल्सचे उजव्या बाजूचे समोरील चाक महामार्गाखाली उतरल्यामुळे ट्रॅव्हल्स खाली जागेत एका बाजूने पलटली. महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव येथील पोलिस उपनिरीक्षक धर्मदास सावरकर सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना अपघाताची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी दाखल झाले व ट्रॅव्हल्स मधील जखमींसह प्रवाश्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. जखमी धर्मेंद्र सतनामी व गंगोत्री सतनामी यांना साकोली टोलप्लाझा अँब्युलन्स ने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे भरती करण्यात आले. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून पसार झाला. महामार्गावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हयगयीने व लापरवाहीने वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर साकोली पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या