Ticker

6/recent/ticker-posts

न्यायमूर्तींकडून भर उन्हात पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :- शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी स्वत:हून पुढाकार घेतला. मंगळवारी रणरणत्या उन्हात ४ तास त्यांनी नक्षत्रवाडी ते जायकवाडी धरण मार्गावर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. याबाबत सुरू असलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान पुढे येणाऱ्या अडथळ्यांची प्रत्यक्ष फील्डवरून स्थिती जाणून घेतली आणि मुदतीत काम पूर्ण करण्याचे तसेच कारवाईचे आदेश देण्याची वेळ येऊ देऊ नका, असे या योजनेचे काम करणारे विभाग व ठेकेदार कंपनीस बजावले.

उन्हाळी सुट्या सुरू असतानाही खंडपीठाने पाणीपुरवठ्याच्या योजनेबाबतच्या सुनावणीसाठी खास मुंबई उच्च न्यायालयास विनंती केली आणि सुटीच्या काळात ७ जून रोजी विशेष न्यायालय भरवून सुनावणी ठेवली आहे. त्या वेळी घेण्यात येणाऱ्या आढाव्याआधी आपण प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या भूमिकेतून त्यांनी हा दौरा केला. विशेष म्हणजे त्यासाठी वैयक्तिक खर्चाने पाहणी केली.

गेली २५ वर्षे धुमसत असलेला शहराच्या पाण्याचा प्रश्न केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागताना दिसत आहे. जून २०२२ मध्ये दाखल जनहित याचिकेनंतर कामास गती मिळाली असून डिसेंबर २०२४ पर्यंत नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम होण्याची आशा आहे. याच्या पडताळणीसाठी खंडपीठाने प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन आढावा घेत सुरू कामांबद्दल समाधान व्यक्त केले. कामास गती देण्याच्या सूचना देत दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आणू नका, असे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना बजावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या