महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
संजय देशमुख चित्रा न्युज
वर्धा: महाराष्ट्र ही समाजसुधारकांची व शूरवीरांची भूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना श्री. कर्डिले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी वृष्टी जैन, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
सुरूवातीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना जिल्हाधिकाऱ्यांनी नमन केले.
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणूनही पाळला जातो. महाराष्ट्र राज्याचा गौरवशाली ईतिहास, प्रथा, परंपरांचे संवर्धन करत राज्याला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नरत राहिले पाहिजे. वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण सर्वांनी या महाराष्ट्रदिनी व कामगार दिनानिमित्त करुया, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ध्वजारोहण करुन परेड कमांडर वृष्टी जैन यांच्या नेत्वृत्वातील परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, पोलीस सायबर शाखा, पुरुष व महिला होमगार्ड पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक आदी पथकांनी परेड संचलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती ज्योती भगत यांनी मानले.
महाराष्ट्र दिनी वीरमाता व वीरपत्नी यांचा सत्कार तसेच
विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शहीदांच्या वीरमाता व वीरपत्नी यांचा सत्कार केला तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण केले.
18 मराठा लाईट इन्फेंट्रीचे शहीद शिपाई संजय महादेव वरहारे यांच्या वीरमाता शांताबाई वरहारे व 268 इंजिनिअर रेजीमेंटचे शहीद शिपाई संजयकुमार चौधरी यांच्या वीरपत्नी जयश्री संजयकुमार चौधरी यांचा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
हिंगणघाट तालुक्यातील सावली (वा) साझाचे तलाठी राजू मनोहर दाते यांना सन 2023-24 आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला. सन 2023-24 मध्ये प्रशासकीय स्तरावर भरीव कामगिरी, उत्कृष्ट नियोजन व अमुल्य सहकार्याबद्दल जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण प्रकाशराव कुऱ्हे, जिल्हातील सर्व बँक व्यवस्थापकाशी समन्वय साधून जिल्ह्यातील प्रकरणे सकारात्मक रित्या मार्गी लावल्याने जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक चेतन सुभाष शिरभाते, सर्व कृषी संबंधित घटकांमध्ये राज्यात वर्धा जिल्हा उत्कृष्ट कसा राहील याविषयी पुढाकार घेत काम केल्याने कृषी पर्यवेक्षक संजय महादेव डोंगरे यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
0 टिप्पण्या