रवी भोंगाने साकोली
साकोली :-आजचे जीवन आत्मकेंद्रीत झाले आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला. कुणालाच कुणाशी भेटायला वेळ नाही. माणूस अगदी झपाट्याने बदलतो आहे. समाज सेवेला वाहून घ्यायचे काम फार कमी लोकं करतात. आपल्याला शिकवितांना काटकोन, त्रिकोण, चौकोन शिकविला जातो. परंतु दृष्टिकोन शिकविला जात नाही. प्रा. डॉ.शंकर बागडे यांनी समाजासाठी स्वतःला झोकून समजाला दृष्टिकोन शिकविला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. ते नागझिरा अभयारण्य रोडवरील भारत सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रा.डॉ शंकर बागडे:- व्यक्तित्व आणि कर्तृत्व या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नागरी सत्कार कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रा.डॉ. बागडे यांचा जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळाही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी जे खुणे, सत्कारमूर्ती प्रा. डॉ. शंकर बागडे, साहित्यिक प्रा.डॉ. अरविंद कटरे, एडवोकेट डॉ. सविता बेदरकर आणि सौ वंदना बागडे व्यासपीठावर विराजमान होत्या. यावेळी प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, सम्यक फाउंडेशन वतीने ज्योती कान्हेकर, समाज प्रबोधन कला संघटनेच्या वतीने मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, पत्रकारांच्या वतीने डी.जी रंगारी, रवी भोंगाने, मनीषा काशिवार, मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने कुमार रामटेके, सुनंदा रामटेके, बालमित्र पंजाबराव कोडापे, तालुका स्मारक भूमीच्या वतीने दीपक साखरे, पटेल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.सी.जे.खुणे, प्रा.विलास हलमारे, संत डोमाजी कापगते , पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने डॉ. बागडे यांचा जाहीर नागरी सत्कार समितीच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. गौरव ग्रंथाचे विमोचन करतांना प्रा. डॉ. खोब्रागडे पुढे म्हणाले की, आजची चिंतनशील परिस्थिती बदलण्याची गरज आहे. डॉ. बागडे यांनी उर्वरित काळ समाजासाठी द्यावा. डॉक्टर बागडे यांची साठाव्या वर्षी सुद्धा जी उर्मी आहे, जी तळमळ आहे त्यातून त्यांच्याकडून दैदिप्यामान कार्य होऊ शकते. अन्न, वस्त्र,निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरी विचारधारा ही एक गरज आहे. एक चांगली विचारधारा खऱ्या अर्थाने समाजाला समोर घेऊन जाऊ शकते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्ती म्हणून डॉ. बागडे यांनी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा गौरव ग्रंथ शक्य झाला असून त्यात सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो असे प्रामाणिक मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास हलमारे, आभार प्रदर्शन ज्योती कान्हेकर यांनी केले.
0 टिप्पण्या