उभे असलेले धान पिक जमीनदोस्त, वातावरणात गारवा
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- अचानक सकाळचे सुमारास वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांना फटका बसला असून परिपक्व झालेले उभे असलेले धान व भाजीपालाजन्य पिकांना फटका बसला आहे. यात शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने नेल्याने शेतकरी हवालदिल होण्याचे मार्गावर आहे. अवकळीमुळे वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामात चांगले उत्पादन झाले नाही. त्यामुळे सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी नगदी पिके म्हणून भाजीपालाजन्य पिकांची लागवड केली होती. जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे धान परिपक्व झाले असून कापणी व माळणीला सुरुवात झाली आहे. यातच यंदा एप्रिल महिन्यापासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे त्याचा फटका शेतमालाला बसत आहे. शेतकऱ्यांनी धान कापणी मशीनच्या सहाय्याने कापणी करणे जोमात सुरू आहे पण धान वाळले नसल्यामुळे वाळविण्यासाठी उन्हात ठेवले होते. अवकाळी पावसामुळे वाळण्यासाठी ठेवलेल्या धानासह शेतात उभे असलेले धानाचे वादळी वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाले आहे. काही धान पाण्याखाली आल्याचे नाव न छापण्याचे अटीवर एका शेतकऱ्याने सांगितले. याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.


0 टिप्पण्या