• चुलबंद नदीच्या लोहारा हद्दीतील प्रकार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी खोऱ्यातील भूगाव आणि मरेगाव रेती घाटातून रेती माफियांकडून रेतीचा अवैध उपसा व वाहतूक सुरू होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांनी रेती माफियांची धरपकड सुरू करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना पकडण्याचा सपाटा सुरू करून गुन्हे दाखल करणे सुरू केल्याने रेती घाटातून रेती उपसा व वाहतूक बंद असली तरी लोहारा येथील २ रेती माफियांकडून लोहारा गावचे हद्दीतून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदीतून अवैध रेती उपसा व शेतातील मार्गाने वाहतूक सुरूच आहे. यावर प्रतिबंध लावणे आवश्यक झाले आहे.
सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत गौण खनिज उत्खनन करू नये. असे शासनाचे दिशानिर्देश आहेत. पण रेती घाटाचे लिलाव झाले नाही तरीही अनेक विकास कामांत रेतीची प्रचंड प्रमाणात मागणी असल्यामुळे तालुक्यातील अनेक रेती घाटातून रेती तस्करांकरवी अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक सुरू होती. पोलिस विभागाचे वतीने यावर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. मागील आठवडाभरापासून रेती उपसा व वाहतूक बंद आहे. त्यामुळे रेतीचे भाव वधारल्याने लोहारा येथील रेती तस्कर ज्याचेकडे न्यू ह्यालेट कंपनीचे विना क्रमांकाचे २ ट्रॅक्टर असून इंजिन चा रंग निळा व ट्रॉली चा रंग लाल आहे. हा रेती तस्कर तसेच त्याच गावातील दुसराही रेती तस्कर मध्यरात्रीपासून लोहारा हनुमान मंदिराजवळून शेतशिवारातील रस्त्याने चुलबंद नदी पात्रातील लोहारा गावचे हद्दीतून मध्यरात्री पासून सकाळपर्यंत अवैध रेती उपसा करून राजरोसपणे वाहतूक सुरू केली असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका गावकऱ्याने सांगितले.
लोहारा येथील रेती तस्करांनी अवैध रेती तस्करी सुरू केल्यामुळे इतरही रेती माफियांत चुळबुळ सुरु आहे. पालांदूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रजेवर गेल्याचे माहिती होताच अवैध रेती उत्खननासाठी काही रेती तस्करांच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल व पोलिस प्रशासन लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत व्यस्त असल्यामुळे तसेच पोलिस विभागातही मनुष्यबळाअभावी काही हित संबंधीयांशी अर्थकारण करून चुलबंद नदी खोऱ्यातील काही रेती घाटावर रेती माफिया सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी साकोली यांनी खबऱ्यामार्फत या रेती माफियांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. तसेच लोहारा येथील २ रेती तस्करांकडून सुरू असलेली रेती तस्करी बंद करणे गरजेचे झाले आहे.


0 टिप्पण्या