रवी भोंगाने साकोली
साकोली:-साकोली नगर परिषदेचे अनेक कारनामे दिवसागनिक बाहेर येत आहे.त्यामुळे साकोली नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचत आहे. नगरपरिषद प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आतापर्यंत झाडांचे १९ संरक्षित पिंजरे चोरट्यांनी लंपास केले. नगरपरिषद प्रशासन याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पर्यावरण संरक्षण समितीने केला असून या चोरीला नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एकोडी फाटा ते तलाव वॉर्ड या बायपास रस्त्यांवर ७० ते ८० झाडे लावण्यात आली. गत ५ वर्षापासून ही झाडे लावण्यात आली असून काही झाडे मोठी तर काही लहान आहेत. या झाडांच्या संरक्षणासाठी नगरपरिषद कडून संरक्षित पिंजरे मागविण्यात आले होते. पण काही महिन्यांपासून या पिंजऱ्यावर भुरट्या चोरांची नजर गेली आणि हळूहळू हे पिंजरे लंपास होऊ लागले. या संदर्भात नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना अवगत करण्यात आले होते. त्यांनी या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करावी अशी मागणी पर्यावरण समितीने केली होती. जेणेकरून पुढचे पिंजरे चोरीपासून वाचतील. परंतु नगर परिषदेने त्या गोष्टीकडेच दुर्लक्ष केल्याने आतापर्यंत तब्बल १९ पिंजरे चोरीला गेले. सुरुवातीला ९ पिंजरे नंतर ६ पिंजरे आणि आता २९ मे रोजी ४ पिंजरे. १९ पिंजरे चोरीला गेल्याने झाडे उघड्यावर पडलीत. झाडांचे पिंजरे चोरीला गेल्याने या झाडांचे जनावरापासून संरक्षण करणे कठीण झाले आहे. नगर परिषद प्रशानन सर्वसामान्य नागरिकांच्या करातून सर्व खर्च करीत असते. झांडाचे पिंजरे ही शासकिय मालमत्ता आहे. असे असतांनाही शासनाच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? निदान आता तरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश वासेकर पिंजरा चोरी बाबतीत पोलीस तक्रार करतील काय ? की आता जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागेल!


0 टिप्पण्या