रवी भोंगाने साकोली
साकोली:-तालुक्यात अवैध व्यवसाय नवीन नाही. अवैध व्यवसाय हा एक आजार आहे आणि तो आजार कधीही बरा न होणारा आहे. हा नेहमी करता तालुक्याला चिकटलेला आजार आहे. या आजारावर पोलीस विभाग शस्त्रक्रिया करण्यासाठी हतबल आहे. अवैध व्यवसायाच्या बाबतीत आता नवीन प्रकार समोर आला असून परवानाधारक मद्य विक्रेत्यांकडूनच साकोली तालुक्यात अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती आहे. परवानाधारक दुकानातून इतर ठिकाणी अवैधरित्या मद्य पुरविले जाते. मात्र हा मद्य प्रवास पोलिस विभागाच्या डोळ्यासमोरून सहिसलामत कसा सुटतो ? साकोली तालुक्यात परवानाधारक देशी दारूचे मोठे जाळे पसरलेले आहे. या दुकानातून मद्य विक्री करून अनेक छोटे मोठे दुकानदार आपापल्या गावी घेऊन जातात किंवा कमिशनवर पुरवठा केला जातो. मद्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची माहिती परवानाधारकडे असते. मात्र कधी कधी एखाद्या अवैध मद्य विक्री करणारा गोत्यात आलाच तर एकतर्फी कारवाईला त्याला समोर जावे लागते. त्यामुळे परवानाधारक मद्य विक्री करणारा व्यवसायिक खरंच आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे काय? परवानाधारक विक्रेत्याकडून अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या परवानाधारकावर कारवाई केव्हा होणार? दुसरीकडे परवानाधारक विक्रेता नियमानुसार १२ तास व्यवसाय करतो आणि अवैध दारू विक्रेते २४ तास दारू विक्री करतात. मग कारवाई कुणावर करणार? २१ वर्षाखालील मुलांना मद्य देऊ नका असाही एक नियम आहे पण याही नियमाची पायमल्ली केली जाते त्याचे काय ?


0 टिप्पण्या