Ticker

6/recent/ticker-posts

डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट, केमिकल कंपनीत आग भडकली, सहा कामगार जखमी..

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज 


डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीनंतर काळ्याकुट्ट धुराचे लोट दूरवरुनही पाहायला मिळत होते. तर स्फोटानंतर काही किलोमीटर अंतरापर्यंत कंपनं जाणवली. परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्याची माहिती आहे. या घटनेमुळे डोंबिवली भागात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे.
डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये काही अंतराने लहान मोठे स्फोट काही काळानंतरही सुरुच राहिल्यामुळे या घटनेची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली एमआयडीसी भाग ही रहिवासी परिसराला लागून आहे. केमिकल कंपन्या असलेल्या भागातच नागरी वस्तीही आसपास आहे. या कारणामुळे स्फोट आणि आगीच्या घटनेचे परिणाम वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे २०१६ मध्ये डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळीही एकामागून एक स्फोट झाल्याने घटनेची तीव्रता वाढली होती.
घटनास्थळी चार-पाच ॲम्बुलन्स दाखल झाल्या. मात्र कंपनीत भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे स्फोटग्रस्त कंपनीमध्ये नेमके किती जण अडकले आहेत? ही आग नेमकी कशामुळे लागली याची तांत्रिक माहिती मिळू शकत नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या