डिफेंस अकॅडेमी शहापूरची पायल गाडेकर विज्ञान शाखेत प्रथम
कोंढा येथील रूपचंद पाचर कला शाखेत प्रथम
जिल्ह्याचा निकाल 94.68 टक्के, मुलींचीच सरशी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक(इयता 12वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी(ता.21मे) दुपारी 1:00 वाजता पोर्टलवर ऑनलाइन रित्या जाहीर करण्यात आला. त्यात भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिखा मुरलीधर जसवानी हिने 98.17 टक्के गुणांसह सर्व शाखांमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर याच महाविद्यालयातील सलिना सलीम खान 97.50 टक्के गुणांसह जिल्ह्यात द्वितीय तर रिया दिलीप खानवानी 95.17 टक्के गुणांसह तृतीय आली. नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्व शाखांमधून प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत.
*पायल विज्ञान शाखेत पहिली(चौकट)*
संत गुलाब बाबा डिफेन्स ॲकॅडमी शहापूरची पायल गाडेकर ही 94 टक्के गुणांसह जिल्ह्यातून प्रथम, लॉर्ड्स पब्लिक स्कूल भंडारा येथील इशिका सुरेश काटेखाये 93.33 टक्के गुणांसह द्वितीय तर याच शाळेतील आदित्य उन्हाळे 90.83 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
रूपचंद कला शाखेत प्रथम
पवनी तालुक्यातील गांधी कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथील रूपचंद साजन पचारे याने कला शाखेत 93.33 टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम, तर विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय अडयाळ येथील अभिषेक दिघोरे याने 89 टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची स्नेहा शेंडे व जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्याल पालोराची सायली कातोरे यांनी 87 टक्के गुणांसह संयुक्तपणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. या दोघींनी कला शाखेत संयुक्तपणे मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे.
जिल्ह्याचा निकाल 94.68 टक्के, मुलींची सरशी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात 2.49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्याचा निकाल 94.68 टक्के लागला असून जिल्हा विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एकूण 166 कनिष्ठ महाविद्यालयांतून 17351 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता, त्यापैकी 17261 विद्यार्थी परीक्षेला बसले, तर 16344 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात 8139 मुलींचा समावेश आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (96.53) मुलांपेक्षा (92.92) चांगली असून यंदाही जिल्ह्याच्या निकालात मुलींचीच सरशी असल्याचे दिसून आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 1231 विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी, तर 4754 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. प्राविण्य श्रेणी प्राप्त झालेल्यांमध्ये सर्वाधिक 334 विद्यार्थी ओम सत्य साई कनिष्ठ महाविद्यालय परसोडीचे, 195 विद्यार्थी संत गुलाब बाबा डिफेन्स अकादमी शहापूरचे आणि 54 विद्यार्थिनी नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथील आहेत.
भंडारा तहसील आघाडीवर
तहसील निहाय निकालात भंडारा तहसील एकूण 96.57 टक्के घेऊन आघाडीवर आहे. यानंतर साकोली तहसील 95.69 टक्के, लाखनी तहसील 94.77 टक्के, पवनी 94.07 टक्के, लाखांदूर तहसील 93.23 टक्के, मोहाडी 93.16 टक्के आणि तुमसर तहसीलचा निकाल 93 टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल असा
विद्याशाखांच्या निकालांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल 98.80 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 96.36 टक्के, कला शाखेचा निकाल 89.01 टक्के, व्यावसायिक (MCVC) विद्याशाखेचा निकाल 85.60 टक्के आणि तांत्रिक शाखेचा निकाल 70.76 टक्के लागला आहे.


0 टिप्पण्या