Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता 1 ते 8 चे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार

 15 जून पासून अंमलबजावणी होणार 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:-  केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
                  शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इ.1 ते 4 विद्यार्थिनी

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार. आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक. स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार. गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक.

इयत्ता 5वी विद्यार्थिनी

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार. आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट. स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार. गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक.

इ.6 ते 8 विद्यार्थिनी व इ.1 ते 8 विद्यार्थिनी(ऊर्दू माध्यम)

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार. आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी. स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार. गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी

इयत्ता 1 ते 7 विद्यार्थी

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार  शुक्रवार. आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट. स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार. स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

इयत्ता 8 वी विद्यार्थी

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार. आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट. स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार. स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पैट

                      शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी तासिका ठेवण्यात येणार आहेत.
                      मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा 15 जून, 2024 पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या(स्काऊट गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येणार आहे. सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी 100 प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी 110 रुपये प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करणार असल्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या