रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-पाळलेल्या कुत्र्याला मुख्य रस्त्यावर घेऊन नको, जाऊ एवढेच आईने सांगितल्याचा राग येऊन १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजवीर राहुल गडकर असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
राजवीरच्या आई-वडिलांचे खडकेश्वर मिल कॉर्नर रोडवर किराणा दुकान आहे. मोठी बहीण, आई-वडील व राजवीर असे कुटुंब मिल कॉर्नर परिसरात वास्तव्यास आहे. नववीत शिकणारा राजवीरला काही महिन्यांपूर्वी कुटुंबाने कुत्रे घेऊन दिले होते. राजवीर रोज त्याच्यासोबत खेळत होता. घर व दुकान मुख्य रस्त्यावरच असल्याने त्यावरून वाहनांची ये-जा वेगात असते. शुक्रवारी राजवीर कुत्र्याला घेऊन मुख्य रस्त्यावर गेला. तेव्हा आईने त्याला आवाज देऊन कुत्र्याला रस्त्यावर घेऊन न जाण्यासाठी रागावले. त्याचा राजवीरला राग आला. घरात जाऊन त्याने आतील खोलीत थेट गळफास घेतला. दरम्यान मोबाईलचे व्यसन सुटावे यासाठी पालकांनी त्याला कुत्रे घेऊन दिले होते. पुढील तपास क्रांती चौक पोलिस करित आहेत.


0 टिप्पण्या