Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण परिसरातील प्रवाशी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात...!

• अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायती उदासीन 

• प्रवाशांची गैरसोय

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- उन, वारा, पाऊस या पासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे या करिता लोक प्रतिनिधींकडून प्रत्येक गावातील बस थांब्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवाशी निवारे तयार करण्यात आले. या प्रवाशी निवाऱ्यात पानठेले, चाय दुकान किंवा धानाचे पोते ठेऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. ही बाब त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. पण गावातील राजकारणामुळे ह्या गंभीर बाबीकडे हेतु पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशी निवाऱ्यावरील अतिक्रमण काढणे आवश्यक झाले आहे. 
            'गाव तिथे एसटी' या प्रमाणे तालुक्यातील सर्वच ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गावरील जवळपास सर्वच गावात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस सेवा सुरू केली आहे. यातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि प्रवाशी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे एसटी जीवनदायिनी झाली आहे. प्रवाशी वाहनांना उशीर झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये. या करिता तत्कालीन आमदार व खासदारांनी स्थानिक कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक गावातील बस थांब्यावर प्रवाशी निवारे तयार केले. काही प्रवाशी निवारे गावालगत तर काही गावाबाहेर आहेत. गावातील प्रवाशी निवाऱ्यालगत चाय टपरी व पानठेले लाऊन अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी धानाचे पोते ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे गावा बाहेर असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात भटक्या अथवा भिकाऱ्यांनी आश्रय घेतला असल्यामुळे प्रवाशांना बाहेर ताटकळत राहावे लागते. प्रवाशी निवाऱ्याची देखभाल व दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबाच्या प्रवाशी निवाऱ्यावर अतिक्रमण असल्यास गावातील राजकारणामुळे ग्रामपंचायत कमिटी अतिक्रमण हटविण्यास हेतु पुरस्पर दुर्लक्ष करते. याचा फटका मात्र प्रवाशांना विशेषतः महिला वर्गांना बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदासीन धोरणामुळेच ग्रामीण परिसरात प्रवाशी निवाऱ्यांवर अतिक्रमण झाले आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या